गणेश सावंत –
महाराष्ट्र मुलुखातल्या कुठल्याही क्षेत्रातल्या आन-बान-शान असणार्या व्यक्तीबद्दल भाष्य करताना आपण कुठे चुकतोय का, त्याच्यासमोर उभे राहताना आपल्याकडून त्या व्यक्तीचा अनादर होतोय का, यासह अन्य छोट्या-मोठ्या गोष्टींचा विचार महाराष्ट्र मातीत निपजलेला प्रत्येक व्यक्ती नक्कीच करतो. परंतु काल विधानसभेमध्ये जे झालं ते पाहिल्यानंतर विधानसभेच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीनेच मराठी भाषेचे अक्षरश: वस्त्रहरण केले नव्हेतर मराठी भाषेचे लक्तरेच जणू वेशीवर टांगले. स्व. आशा भोसले यांचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने शोकप्रस्ताव मांडला मुळात तो शोक प्रस्ताव आशा भोसले यांचा होता की मराठी भाषेचा तो शोकप्रस्ताव होता? ज्या पद्धतीने नार्वेकरांनी लिखित शोकप्रस्ताव वाचला आणि थेट आशा भोसले यांचा पिता बदलून टाकला त्यावरून नार्वेकर यांच्या मराठी भाषेबाबत अधिक स्पष्टकता महाराष्ट्रासमोर उघडी नव्हेतर नागडी पडते. ज्या विधानसभेतून मराठी भाषेच्या अधिकारावर भाष्य केले जाते, तिच्या संवर्धनापासून सक्तीपर्यंत बोलले जाते त्या माय मराठीची वाट विधानसभा अध्यीच लावत असेल तर परप्रांतियांकडून मराठी भाषेची अपेक्षा ती काय करावी? त्यापेक्षा अध्यक्ष बोलत असताना अत्यंत निकृष्ट दर्जाचे मराठी भाषेचे वाचन करत असताना एकही सत्ताधारी असो अथवा विरोधक असो कोणीही यावर हरकत घेतली नाही. याचा अर्थ

मराठी भाषेची किंमत
आणि महत्व विधानसभा अध्यक्षांबरोबर इतर सदस्यांनाही नाही हेच स्पष्ट होते. महाराष्ट्राच्या या विधानभवनाला लोकशाहीचे मंदिर म्हटले जाते. याच मंदिरात महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, इतिहासाचा, अस्मितेचा आवाज घुमायला हवा. परंतु दुर्दैव, ज्या सभागृहातून मराठीच्या संरक्षणाच्या घोषणा दिल्या जातात त्याच सभागृहता मराठी शब्दांचा अक्षरश: गळा दाबला जातो. ही नुसती चूक नाही तर मराठीप्रति असलेली बेफिक्रीची जाहीर कबुली म्हणावी लागेल. ज्येष्ठ गायिका यांच्या शोक प्रस्तावासारख्या अत्यंत संवेदनशील क्षणी भाषिक चूका हा फक्त उच्चारक विषय नाही तो तयारीचा, जबाबदारीचा, भाषेप्रति असलेल्या आदराचा विषय आहे. हातात लिहिलेला मचकूर असूनही तो अचूक वाचला जात नसेल तर मराठीच्या नावाने राजकीय भाषणे करणार्यांनी आधी आरश्यात स्वत:चा चेहरा पाहण्याची वेळ आता नक्कीच आली आहे. त्यापेक्षा महत्वाचे जिथे दिनानाथ मंगेशकर उच्चारायचे तिथे दिनदयाळ असे उच्चारले गेले. नार्वेकरांना दिनानाथ मंगेशकरांसारखे उच्च कोटीचे आणि दिनदयाळ उपाध्यायसारख्या उंचीच्या माणसांबद्दल खरचं माहित नाही? हे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचा तो सर्वात मोठा कपाळमोक्ष म्हणावा लागेल.
मराठी भाषेची उंची
किती? या प्रश्नाचं उत्तर एखाद्या लहान बाळाला आईच्या दुधाचे महत्व जेवढे तेवढेच अथवा त्यापेक्षा अधिक मराठी भाषेची उंची म्हणावी लागेल. मराठी भाषेचे महत्व, तिची गोड आणि महंती सांगणारे अनेक काव्य संत-महात्मे आणि समाजसुधारकांनी लिहून ठेवले. संत ज्ञानेश्वर महाराजांचा मराठी भाषेबाबतचा हा अभंग ‘माझा मर्हाठीची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐसे अक्षर मिळविली’ माऊली म्हणतात, ‘मी माझ्या मराठी भाषेचा अत्यंत कौतुकाने आणि प्रेमाने अभिमान बाळगतो, माझी मराठी भाषा इतकी गोड आणि रसाळ आहे की ती स्वर्गातील अमृतालाही जिंकू शकते’ तर जगद्गुरू संत तुकोबा मराठी शब्दांचे महात्म्ये सांगताना ‘आम्हा घरी धन शब्दाची रत्ने शब्दाची शस्त्रे यत्न करू, शब्दची आमच्या जिवाचे जिवन, शब्द वाटू लोका धन’ मराठी भाषेची आणि त्यातील शब्दांची महंती-महत्व या दोन संतांच्या या अभंगातून स्पष्ट होते. तसे तर इथे मराठी भाषेवर भाष्य करणार्यांची यादी लिहायला सुरुवात केली, तर नार्वेकरांचं आतापर्यंतचं आयुष्यही त्यात संपेल. नार्वेकरांचे ते वाचन ऐकल्यानंतर ‘टाईमपास’ चित्रपटातला तो संवाद आठवतो.
‘नया है यह’
त्यापुढे ‘काय रे तुझी भाषा’
जेव्हा मंत्रालयाच्या दारामध्ये मराठी भाषा ठिगळांच्या लुगड्यात उभी असेल तर मग महाराष्ट्र मुलुखातल्या वाडी-वस्ती-तांड्यावर मुंबई महानगरीसह शहराच्या नाक्या नाक्यावर ती साजश्रृंगार घालून उभी तरी कशी असेल? जिथे मराठी भाषेचं संवर्धन करण्याचा सर्वोच्च अधिकार प्राप्त व्यक्तीच मराठी भाषेला घोडा लावत असेल तर इतरांचे काय? मराठी भाषा ही अत्यंत मधूर-रसाळ आणि बोलण्यासह लिहिण्याला , वाक्यप्रयोगाला अत्यंत सोपी. जगाच्या पाठीवर मराठी भाषा ही सर्वश्रेठ, तरीही विधानसभा अध्यी या भाषेबाबत इतके उदासीन पहायला मिळतात तेव्हा मंत्रालयाच्या दारातच मराठी भाषेची अब्रू निघते. मराठी वाचता न येणे ही लाज नाही, पण मराठीची जबाबदारी सांभाळणार्यांनी ती शिकण्याची गरज वाटू नये ही खरी शोकांतिका आहे.







