गणेश सावंत
मराठवाड्याचा दुष्काळवाडा होऊन बसलाय. हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. मराठवाड्यातल्या कुठल्याही रस्त्याने तुम्ही निघालात तर शेतातले पिक ओरडून सांगेल ‘आम्हाला पाणी द्या’ शेतकर्याच्या डोळ्यात तेच पाणी ओसंडून वाहताना दिसेल एवढी भयावह वास्तविकता असताना आमच्या मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातल्या दुष्काळी बांधावर नक्षलवादी दिसतायत का? मराठवाड्यातला शेतकरी अतिरेकी आहे का? इथला कष्टकरी प्रशासनाला माओवादी दिसतोय का? हे थेट प्रश्न विचारण्याचे कारण एवढेच, गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री मराठवाडा दौर्यावर आहेत. ते शेतकर्यांच्या शेतातील थेट बांधावर गेले. त्यांचं स्वागत ! परंतू वरील चार फोटो पहा, आणि आम्ही विचारलेले प्रश्न चुकीचे आहेत का? हे स्पष्ट सांगा, शेतकर्याच्या बांधावर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाहेतू मेटल डिटेक्टर लावल्याचे आम्ही प्रथमच पाहिले. दुसरा फोटो हा हिरवागार बांध दिसतोय. तिसर्या फोटोत कठड्याच्या आत शेतकरी दिसतायत. तर चौथ्या फोटोत मुख्यमंत्री उसाचे पाचरट पाहताना दिसतायत. प्रश्न एवढाच, हा भयावह दुष्काळ आहे मग हिरवागार बांध दाखवण्यापेक्षा वस्तूनिष्ठ उद्ध्वस्त झालेलं शेत प्रशासनाने का दाखवला नाहीत, मुख्यमंत्र्यांना कसली भीती? शेतकर्यांना कठड्याच्या आत ठेवले गेले. मेटल डिटेक्टरने शेतकर्यांची तपासणी केली गेली. ही
खरच दुष्काळ पाहणी आहे का?
हा प्रश्न याठिकाणी उपस्थित होतो. शेतकर्यांच्या शेतात पाऊल ठेवून त्यांची व्यथा ऐकण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आले खरे, त्यांचं मराठवाड्यात आम्ही स्वागतही करू, पण दुष्काळ पाहणी दौर्यादरम्यान हा सुरक्षेच्या नावाखाली केलेला थाटपाट निव्वळ सरकारी इव्हेंट दिसतोय. दुष्काळाने शेतकर्यांच्या शेतात तळे गेले, पिके करपले, जमीनी भेगाळल्या, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, बाजरी हातातून गेले, मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पडून शेतकरी धाय मोकलून रडला. त्या अजान, निष्पाप, संकटाने व्यापलेला शेतकर्यापासून मुख्यमंत्र्यांना काय तो धोका? जागोजागी दोरखंड, कडेकोट सुरक्षा पाहिल्यानंतर हे स्पष्ट होतं, सरकार आणि शेतकरी यांच्यात किती मोठी दरी आहेे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकर्यांच्या बांधावर जात असतील, ते पाहणी करणार असतील तर शेतकरी शासन-प्रशासन व्यवस्थेला संशयित का वाटवाा? खरंतर मुख्यमंत्र्यांनी बळीराजाच्या हातात हात द्यायला हवा, परंतु इथे त्या शेतकर्यांच्या भोवती सुरक्षा कवचाचे कुंपणे उभे करण्याची वेळ का आली? हे प्रश्न विचारावेच लागतील. या स्वाभिमानी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा असावा? तो
अजातशत्रू
नक्कीच असावा. त्याच्या सोबत विरोधकांचे मतभेद असतील, अंतर्गत स्वपक्षियांचे कपटी डाव असतील, तिथे मुख्यमंत्र्यांनी पुरून उरावे परंतु महाराष्ट्राच्या कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांसोबत मुख्यमंत्र्यांचे मैत्रीस्तव संबंध असावेत, त्या प्रत्येक व्यक्तीला होय, हा माझा मुख्यमंत्री नाही, तर राजा आहे असे प्रत्येक माणसाला वाटावे. परंतु इथे उलट. विरोधकांना फोडाफोडीतून सरकार गळ्याला लावत आहे. स्वपक्षियांचे कपटी डाव उलटून लावताना त्यांना मलिदा वाटण्यात येत आहे अन् शेतकर्यांच्या बांधावर गेल्यानंतर शेतकरी अतिरेकी, नक्षलवादी, माओवादी असल्यागत त्या शेतकर्याला तशी वागणूक दिली जात आहे. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांबाबत या वर्तवणुकीवर लोकांचे मत ते काय होईल. वरील फोटो पाहिल्यानंतर आमच्याच काय कोणाच्याही तळपायाची आग मस्तकाला जाईल. कारण प्रत्येक फोटो बोलका आहे आणि दुष्काळ पाहणीची ती एक फोटोसेशन कहाणी आहे हे ओरडून सांगतोय.
दुष्काळ फोटोसेशनच्या चौकटीत
नसतो. हे दुर्दैवाने आम्हाला सांगावं लागतेय. शेतात सोयाबीन जळाले, कापूस करपला, मूग, उडीद, बाजरी हातातून गेली आणि मुख्यमंत्र्यांच्या हातात उसाचं पाचरट दिसतय. हो उसाची शेतीही उद्ध्वस्त झाली, परंतु खरं दुष्काळी वास्तव कोणी दाखवणार आहे की नाही? दुष्काळाला फोटोसेशनची चौकट नसते. दुष्काळाला हिरवं पडदा लावता येत नाही. दुष्काळ टेबलावर ठेवून पाहता येत नाही. दुेकाळ दोरखंड लावून ठराविक जागेमध्ये उभा करता येत नाही. दुष्काळ हा शेतकर्यांच्या भेगाळलेल्या जमीनीत असतो, कोरड्या विहीरीत असतो, जनावरांच्या पाण्याच्या हंबर्ड्यात असतो, तो शेतकर्यांच्या डोळ्यात असतो. परंतु तिथे आम्हाला पहायचं नाही, कारण शेतकर्यांच्या डोळ्यात पाहण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही. वस्तूस्थिती जाणून घेण्याची अभिलाषा या सरकारमध्ये नाही. कारण गेल्या आठवड्यातच
मंत्र्यांच्या बैठकीत काजू – बदाम
उभ्या महाराष्ट्राने पाहितले. नव्हे नव्हे तर ते काजू-बदाम खाताना मंत्री चित्रीत झाले. त्यावर मंत्र्यांनी म्हटले, अधिकार्यांना समजत नाही, कुठे काय ठेवावे. ही दुष्काळी बैठक आहे, आणि त्या दुष्काळी बैठकीत अधिकार्यांनी काजू-बदाम आणून ठेवले. आम्ही त्यांना म्हणालो होतो का, काजू-बदाम आणा. टेबलावर होते म्हणून दोन खाल्ले. मंत्र्यांचे हे उत्तर किती समर्पक हे देव जाणो. जर प्रशासनातील अधिकार्यांना दुेकाळाचे गांभीर्य नसेल तर तिते शासन म्हणून, सरकार म्हणून आमदारापासून मुख्यमंत्र्यांपर्यंतच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने प्रशासनातील अधिकारी जी कोंडी करू पाहत आहेत ती कोंडी फोडण्याचे काम करायला हवे. परंतु काजू-बदाम खाणार्या मंत्र्यांपेक्षा मुख्यमंत्रीच जर आपल्याला शेतकर्यांपासून धोका आहे म्हणत शेतात मेटल डिटेक्टर लावून शेतीची पाहणी करत असतील तर या सरकारमधील ‘हमाम मे सब नंगे’ नसतील कशावरून. मराठवाडा हा दुष्काळाने अक्षरश: होरपळून गेला हे त्रिवार सत्य समजून घ्या. आज मेटल डिटेक्टर लावलय, उद्या मराठवाड्यात येण्यासाठी देशाची आर्मी घेऊन येणार का?









