मुंबई (रिपोर्टर) एकीकडे राज्यात राज्यसभा निवडणुकीवरून वातावरण तापलेलं असतानाच आता विधानपरिषद निवडणुकांसाठी देखील हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी दोन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलं आहे. लवकरच शिवसेनेकडून या दोन नावांची अधिकृत घोषणा होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेनेनं आपल्या सर्व आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवलेलं असताना विधानपरिषद निवडणुकीसाठी देखील उमेदवार निवड निश्चित करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराला राज्यसभेसाठी पाठिंबा देण्याच्या बदल्यात विधानपरिषदेची एक जागा भाजपासाठी सोडण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडून देण्यात आला होता. मात्र, ही चर्चा अपयशी ठरल्यानंतर राज्यसभा निवडणुका होणार असल्याचं निश्चित झालं. त्यापाठोपाठ विधानपरिषद निवडणुकांसाठी आता शिवसेनेकडून नावं निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे.