चाकूरकरांच्या घरातच स्वतःवर झाडली गोळी; लातूरमध्ये खळबळ, तपास सुरू
लातूर (रिपोर्टर) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत बंधू चंद्रशेखर पाटील यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी रविवारी सकाळी 9 च्या सुमारास लातूर येथील शिवराज पाटलांच्या देवघर या निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या घटनेमुळे लातूरमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
चंद्रशेखर पाटील यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरात आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. 81 वर्षीय चंद्रशेखर पाटील शेती करत होते. त्यांच्याकडे बंदुकीचा परवानाही होता. त्यांच्या पश्चात 2 मुले, विवाहित मुलगी, नातंवडे असा मोठा परिवार आहे. त्यांची दोन्ही मुले वकील आहेत. त्यांचे कौटुंबिक वातावरण व सार्वजनिक जीवनही चांगले होते. त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्याचे वकील पुत्र लिंगराज पाटील तातडीने घटनास्थळी पोहोचले. चंद्रशेखर पाटील वृद्धापकाळाशी संबंधित आजार व मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले जात आहे.