कडा (रिपोर्टर) प्लंबर म्हणून काम करत असलेल्या एका 25 वर्षीय तरूणाने माळरानावर असलेल्या बाभळीच्या झाडाला पॅन्टच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना कडा येथे रविवारी सायंकाळच्या दरम्यान घडली. आकाश बापू भाकरे असे मृत तरूणाचे नाव आहे. आकाशने आत्महत्या का केली? हे अद्याप समजू शकले नसले तरी पोलीस आकाशच्या आत्महत्येचे कारण शोधत आहेत. आज त्याच्या पार्थीवदेहावर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
आष्टी तालुक्यातील कडा येथील आकाश बापू भाकरे हा लहानपणापासून मामाकडे राहत असे. तो प्लंबीगचे काम करत होता. शनिवारी रात्री आकाश घरी आला नव्हता. दरम्यान, रविवारी सायंकाळी शहरापासून जवळ असलेल्या माळरानावर बाभळीच्या झाडाला त्याचा मृतदेह लटकताना आढळून आला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मूत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.