भाटवडगावात घडली
रात्री घटना
आरोपी पतीस पोलिसांनी घेतले ताब्यात
माजलगाव (रिपोर्टर) लग्नामध्ये सासरच्या लोकांनी काहीच दिले नाही, असं म्हणत विवाहित महिलेचा पतीकडून सातत्याने छळ केला जात असे. रात्री पतीने पत्नीस तीक्ष्ण हत्याराने मारहाण करून गंभीररित्या जखमी केले. जखमी महिलेवर बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. ही घटना माजलगाव तालुक्यातील भाटवडगावात घडली. आरोपीस पतीस माजलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.
अनंत भागवत सुगडे (रा. भाटवडगाव, वय 38 वर्षे) याचे काही वर्षापूर्वी प्रतिभा (वय 29 वर्षे) हिच्या लग्न झाले होते. लग्नामध्ये सासरच्यांनी काहीच दिलं नाही, असा तगादा अनंत हा लावत असे, त्यासाठी तो आपली पत्नी प्रतिभा हिचा सातत्याने छळ करत असे. तिला मारहाणही होत असे. रात्री त्याने पुन्हा वाद उकरून काढला. यातच अनंत याने प्रतिभा हिला तीक्ष्ण हत्याराने वार करून तिला गंभीररित्या जखमी केले. जखमी प्रतिभाला उपचारार्थ माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात रात्री दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान प्रतिभाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी अनंत भागवत सुगडे याच्या विरुद्ध कलम 302, 498 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पीएसआय दाभाडे हे करत आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.