बीड (रिपोर्टर):बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महाविद्यालयात 12 वीच्या वर्गात शिकणार्या मुलीने शेवटचा पेपर झाल्यानंतर एका बी.कॉमच्या द्वितीय वर्गात शिकणार्या मुलासोबत धुम ठोकली होती. त्यानंतर 18 वर्षे पुर्ण झाल्यावर त्यांनी लग्नही केले. मात्र लग्न करण्यापूर्वी ते दोघे एका किरायाच्या रुममध्ये राहिले होते. त्या दरम्यान मुलीशी त्याने संबंध ठेवल्याने पोलीसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपक शंकर कानडे याची बीड शहरामधील एका अल्पवयीन मुलीशी गेल्या चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. 12 वीचा शेवटचा पेपर दिल्यानंतर त्या दोघांनी 22 फेब्रुवारी 2022 रोजी दुचाकीवरून धुम ठोकली. त्यानंतर दिपकचा मावसभाऊ इंदर अशोक खरात याच्याकडे ते गेले, त्याने त्या दोघांना एक किरायाची चारचाकी करून दिली. त्या गाडीने ते नाशीकला गेले. त्यानंतर काही दिवसांनी ते औरंगाबादला आले. 2 जुलै रोजी मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर 5 एप्रिल रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली व ते पनवेलला गेले. औरंगाबादमध्ये राहत असतांना लग्नापूर्वी दिपकने बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. आपल्या मागावर पोलीस असल्याचे दिपकला कळून चुकले होते. शिवाय बीड शहर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत त्याचा मावसभाऊ आणि ते ज्या वाहनातून फरार झाले होते, त्या चालकाला ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी केली. त्यामुळे दिपकला पोलीसांना शरण यावे लागले. या प्रकरणी दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात बाललैंगिक अत्याचार आणि बलात्काराचे कलम पोलीसांनी वाढवले. सध्या बीड शहर पोलीसांच्या ताब्यात आरोपी दिपक कानडे, त्याचा मावसभाऊ इंदर खरात आणि अन्य एकजण पोलीसांच्या कस्टडीत आहेत. तर पिडीतेला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार, उपअधिक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. रवी सानप, सहाय्यक निरीक्षक ढाकणे यांनी केली.