केज तालुक्यातील जवान शहीद
उद्या शासकीय इतमामात कोल्हेवाडी येथे अंत्यसंस्कार
केज (रिपोर्टर): राजस्थान राज्यातील सुरतगड येथे कर्तव्य बजावत असणार्या 23 वर्षीय जवानाला विजेचा शॉक लागल्याने सदरील जवान शहीद झाला. या जवानाचा पार्थीवदेह उद्या केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथे येणार असून शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या घटनेने केज तालुक्यात शोककळा पसरली आहे. सहा महिन्यांपूर्वीच या जवानाचे लग्न झाले होते.
कोल्हेवाडी येथील उमेश नरसू मिसाळ (वय 23 वर्षे) हा जवान दोन वर्षांपूर्वी सैन्यामध्ये भरती झाला होता. सध्या तो राजस्थान राज्यातील सुरतगड येथे सैन्यदलात मराठा बटालियन 25 मध्ये कार्यरत होता. सोमवारी सकाळी सात वाजता धावत असताना अंडरग्राऊंड करण्यात आलेल्या लाईटफिटिंगचा विद्युत प्रवाह पावसाने साचलेल्या पाण्यात उतरल्याने उमेश मिसाळ यांना शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुरतगड येथे त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. जवानाचे पार्थीव सायंकाळी दिल्लीला आणि दिल्लीहून विमानाने औरंगाबादला आणण्यात येणार आहे. उद्या दुपारी सैन्यदलाच्या वाहनाने कोल्हेवाडी येथे पार्थीव आल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जवानाच्या पश्चात आई, वडिल, दोन भाऊ, पत्नी असा परिवार आहे.