पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ
नेकनूर (रिपोर्टर): नेकनूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यास पोलीस प्रशासनाला अपयश येऊ लागले. डी.एड. कॉलेजमध्ये चोरीची घटना घडूनही याबाबतची फिर्याद दाखल करून घेण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत. पोलीस का फिर्याद दाखल करून घेत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून नेकनूरसह हद्दीमध्ये चोरीच्या घटना वाढल्या. काही दिवसांपूर्वी नेकनूरच्या अध्यापक विद्यालयामध्ये चोरीची घटना घडली. कार्यानुभव विभागाच्या रुमची कडी तोडून चोरट्याने आतील काही साहित्य चोरून नेले. याबाबतची फिर्याद देण्यासाठी प्राचार्य नजीब सर गेले असता त्यांची फिर्याद दाखल करून घेण्यास पोलीस टाळाटाळ करू लागले आहेत. याची दखल सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी घेऊन कॉलेजची फिर्याद का दाखल करून घेतली जात नाही, याचा जाब संबंधित ठाणेप्रमुखाने विचारावा, अशी मागणी केली जात आहे.