अंगणवाडी सेविकेचा पतीने केला खून
धावज्याचीवाडी येथे घडली घटना
आरोपी पती स्वत: ठाण्यात हजर
नेकनूर (रिपोर्टर): पत्नीला शेतामध्ये नेऊन तिच्या डोक्यात खोर्याचा दांडा मारून तिचा निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान धावज्याचीवाडी येथे घडली. घटना घडल्यानंतर आरोपी पती स्वत: नेकनूर पोलीस ठाण्यात शरण आला. आपण पत्नीची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. या घटनेनंतर सहायक पोलीस अधिक्षक कुमावत आणि नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. ही खुनाची घटना कुठल्या कारणावरून घडली हे मात्र समजू शकले नाही.
मंगल गुंडीराम भोसले (वय 45 वर्षे, रा. धावज्याचीवाडी) ही महिला गावातच अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती. आज सकाळी गुंडीराम याने आपल्या पत्नीला शेतामध्ये नेले. त्या ठिकाणी नेल्यानंतर तिच्या डोक्यात खोर्याच्या दांड्याने जबर मारून तिचा खून केला. घटना घडल्यानंतर आरोपी गुंडीराम भोसले (वय 50 वर्षेे) स्वत: नेकनूर पोलिसांना शरण आला. आपण पत्नीची हत्या केल्याची त्याने पोलिसांना कबुली दिल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले होते. या घटनेने नेकनूर परिसरात एकच खळबळ उडाली. सहायक पोलीस अधिक्षक कुमावत व नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. पतीने पत्नीची कुठल्या कारणावरून हत्या केली हे मात्र समजू शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास नेकनूर पोलीस करत आहेत.