पश्चिमेकडचं पाणी पुर्वेकडे वळवण्यात यावा, अशी मागणी मी अनेक वेळा साहेबांकडे केली, मात्र माझ्या मागणीची दखल तितकी घेतली गेली नाही. तिकडचे पाणी मराठवाड्यात आले तर मराठवाड्याचा चांगला विकास होईल, असे सांगत पवार साहेब माझ्या, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात गेले होते, त्याठिकाणी त्यांनी आमच्यावर तोफा डागल्या. मात्र साहेब तुम्हीच हा रस्ता आम्हाला दाखवला. भाजपसोबत जाण्यासाठी 54 आमदारांनी एकत्रित येऊन सह्या केल्या होत्या, त्याबाबत का बोलत नाहीत, अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत, तुम्ही बारामतीत सांगितलं, अजितदादा आमचे नेते आहेत, मग त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाला मान्यता द्या आणि भांडण मिटवून घ्या, असे पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
पुढच्या निवडणुका दादांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार -तटकरे
आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार असल्याचे सांगत महायुतीत सहभागी व्हावे, असा एकमुखी निर्णय आम्ही घेतलेला आहे. दादा शब्दाचे पक्के आहेत, त्यांचं नेतृत्व खंबीर असल्याचे खा. सुनिल तटकरे यांनी म्हटले आहे.
लोकशाही पद्धतीने आम्ही निर्णय घेतला -प्रफुल्ल पटेल
राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात, आम्ही जो निर्णय घेतला आहे तो लोकशाहीला धरुनच घेतला आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व एकत्रित आलो आहोत. आता विकास कामाला चालना मिळणार आहे, असे खा. प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.








