सरकारविरुद्ध निषेधाच्या घोषणा, जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
बीड (रिपोर्टर): मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसह सराटे अंतरवलीत आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठींबा देत तेथील आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्या विरुद्ध सरकारचा निषेध करताना बीडच्या महिलांनी स्वत:ला जमीनीत गाढून घेत आंदोलन सुरू केले आहे. वासनवाडी शिवारात हे आंदोलन होत असून भरपावसात हे आंदोलन होत असताना याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
वासनवाडी शिवारातील एका शेतात खुर्चीवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवत मिराताई डावकर, सारीकाताई गायकवाड, सुरेखाताई जाधव, नैनाताई भाकरे, आशाताई ढोले या पाच महिलांनी आज सकाळी एका शेतात खड्डा खांदून गळ्यापर्यंत स्वत:ला गाढून घेतले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसह सराटे अंतरवलीतील आंदोलक मनोज जरांगे यांना या आंदोलनाच्या माध्यमातून त्या पाठींबा देत असल्याचे सांगत आहेत. शासनाने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. या आंदोलनाकडे पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.