संतप्त तरुणांची दोन पंडितांसह पवारांच्या निवासस्थानासमोर घोषणाबाजी
मराठा आरक्षणावरून राज्यभरात भडकलेल्या वणव्यात आता राजकीय नेत्यांचे हात भाजायला सुरुवात झाली असून आज सकाळी गेवराई विधानसभा मतदारसंघातल्या ग्रामीण भागातून आलेल्या हजारोंच्या संख्येने असलेल्या तरुणांची मोटारसायकल रॅली शहरात धडकली. या संतप्त तरुणांनी गेवराईच्या तिन्ही नेत्यांचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, अशा घोषणा दिल्या. विद्यमान आमदार लक्ष्मण पवार, माजी मंत्री बदामराव पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित या तिघांच्याही निवासस्थानाबाहेर जावून या तरुणांनी प्रचंड घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय भाग घेतला जावा, नेत्यांनी स्पष्ट भूमिका समाजासमोर मांडावी, अशी मागणी या तरुणांची होती.