एलसीबीची दोन ऑनलाईन चक्री जुगारावर धाड
बीड (रिपोर्टर)- पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. स्थानिक गुन्हे शाखेला या अवैध धंद्याची माहिती मिळताच पोलिसांनी दोन ठिकाणी सुरू असलेल्या ऑनलाईन चक्री जुगारावर धाडी टाकल्या या वेळी मोठ्या प्रमाणात रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 26 सप्टेंबर रोजी पेठ बीड भागातील कडबा मळी व चांदणी चौक या दोन ठिकाणी अवैध चक्री जुगार सुरू होता.
पोलिसांनी त्याठिकाणी छापा मारला असता जुगार चालवणारा आरोपी शेख रिजवान बाबू (रा. इस्लामपुरा), शेख एजाज शेख चांद (रा. गांधीनगर, पेठ बीड), शेख फय्याज शेख चांद (रा. गांधीनगर) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ऑनलाईन चक्री जुगार चालविण्याचे साहित्य असा रोख एकूण 57 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी पेठ बीड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पो.उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार प्रल्हाद चव्हाण, मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचीन आंधळे, नारायण कोरडे, अशोक कदम यांनी केली.