हिंगोली (रिपोर्टर): ओबीसींच्या महामेळाव्याला हिंगोलीच्या रामलीला मैदानावर सुरुवात झाली असून व्यासपीठावर ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यासह आदी मान्यवर नेत्यांची उपस्थिती दिसून येत आहे. मेळाव्यापूर्वी छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘माझा ताफा कुठेही थांबला नाही, या देशात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.’
हिंगोलीच्या रामलीला मैदानावर ओबीसीचा मेळावा होत असून या मेळाव्यातून ओबीसी नेते कुणावर भाष्य करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात हा मेळावा होत आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भुजबळ हे रामलीला मैदानावर डेरेदाखल झाले. तत्पूर्वी छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. या वेळी भुजबळ यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यावर सभेपूर्वी माध्यमाशी बोलताना भुजबळ म्हणाले, दोन तीन ठिकाणी चार-पाच लोक होते त्यामुळे कुठेही माझा ताफा अडवला नाही, तसेच आपला ताफा कुठेही थांबला देखील नाही. या देशात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे त्यामुळे मी सभेला जाणारच आहे. त्याचबरोबर मी प्रकाश आंबेडकर यांना सांगतो, मी त्यांच्या विरोधात एकही शब्द बोललो नाही, या अडचणीच्या काळात आम्हाला त्यांचे सहकार्य पाहिजे. सोबतच मंडल आयोगासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे, मला खात्री आहे की ते आमच्या सोबत आहेत. त्यांनी सांगितलं आहे. मराठा आणि भुजबळांचे ताट वेगवेगळे पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.











