बीड (रिपोर्टर):बीड जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग नेहमी चर्चेत आणि मलईदार आहे. त्यामुळे या ठिकाणी पदस्थापना मिळवण्यासाठी आणि त्यातले त्यात चांगला टेबल मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेमधील काही माहीर असलेल्या कर्मचार्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी न्यायालयीन माहिती वेळेत न दिल्यामुळे येथील कनिष्ठ आणि वरिष्ठ तसेच वरिष्ठ सहाय्यक या पदावरच्या तीन कर्मचार्यांना निलंबीत केल्यानंतर या ठिकाणी येण्यासाठी दोघा जणांनी चांगलीच फिल्डींग लावली आहे. याबाबतची चर्चा मात्र दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेमध्ये चांगलीच रंगताना दिसत आहे.
जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक विभागाला वरिष्ठ प्रशासन अधिक्षक आणि कनिष्ठ प्रशासन अधिक्षक ही दोन महत्वाची पदे असतात. त्या विभागातील प्रत्येक फाईल ही त्यांच्या हाताखालून जात असते. त्यामुळे फाईलवर सही करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मलईही मिळते. जिल्हा परिषदेचे दोन अधिकारी निलंबीत झाल्यामुळे कृषी आणि अन्य एक ठिकाणी कार्यरत असलले दोन प्रशासन अधिक्षकांनी थेट मोठ्या राजकीय हस्तीकडून मुख्य कार्यकारी अधिकारी पाठक यांच्याकडे वशिला लावला आहे. ज्या दोन अधिकार्यांनी ही फिल्डींग लावली आहे. त्यांना जिल्हा परिषदेच्या प्रशासनातील काडी न काडी माहित असल्यामुळे हे दोन अधिकारी शिक्षण विभागात मलई चाखण्यासाठीच येत असल्याचे सुत्रांकडून समजते.