बीड (रिपोर्टर): उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कार्यकारिणीमद्ये काही दिवसांपूर्वी बदल करून नवीन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये अनिल जगताप यांना डावलण्यात आल्याने बीड बाजार समितीच्या उपसभापतीसह दोन संचालकांनी आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाला जय महाराष्ट्र करत आपण अनिल जगताप यांच्या पाठिशी उभे असल्याचे सांगितले. जगताप भविष्यात जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचे या वेळी संचालकांनी सांगितले.
उपसभापती शामराव पडुळे, संचालक धनंजय गुंदेकर आणि दीपक काळे यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिेदषदमध्ये या तिघांनी शिवसेनेला जयमहाराष्ट्र करत अनिल जगताप यांच्या पाठिशी आपण उभे असल्याचे सांगितले. बाजार समितीमध्ये केवळ अनिल जगतापांमुळेच आपण निवडून आल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाने लोकांमध्ये असलेल्या नेत्यावर अन्याय केला. अनिल जगताप यांच्यावर महत्वाची जबाबदारी देण्याऐवजी त्यांना साईड पद देऊन वेगळे पाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले. जगताप भविष्यामध्ये जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, आम्ही त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे संचालकांनी सांगितले.