बीड (रिपोर्टर): 6 डिसेंबर 1956, ज्यांनी चंदनाच्या चितेवर भीम पाहिला, त्यांनी आज कोटी कोटी आस्वांचा पुर वाहिला, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अखिल भारतीय बौद्ध महासभा आणि हजारो भीम अनुयायांनी आज डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
आज डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा 67 वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्याअनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून अखिल भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आंबेडकरांची समता ज्योत महारॅली शहरात काढण्यात आली. या महारॅलीचे आगमन डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झाल्यानंतर अभिवादनाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रथमत: भीमध्वज अर्ध्यावर खाली घेत त्रिशरण आणि बुद्ध वंदनेद्वारे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. या वेळी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ शेकडो मेनबत्त्याही पेटवण्यात आल्या. त्यानंतर पंचशील त्रिशरण यांचेही वंदन करण्यात आले. या वेळी हजारोंच्या संख्येने सर्वस्तरातील भीम अनुयायांसह जनसामान्य उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने आ. संदीप क्षीरसागर, प्रा. डॉ. पांडुरंग सुतार, अॅड. अविनाश गंडले, प्रा. प्रदीप रोडे, उत्तम पवार, माजी सहकार अधिकारी एच.पी. कांबळे सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.