बीड (रिपोर्टर): बीड शहरातील तेलगाव रोड लगत असलेल्या दारुल उलूम या संस्थेला साठ वर्षे पुर्ण होत आहेत. यानिमित्ताने 16 डिसेंबर रोजी भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याला मार्गदर्शन करण्यासाठी हजरत मौलाना मोहम्मद सलमान बिजनोरी यांच्यासह आदी मान्यवर येणार असून या सोहळ्यानिमित्त बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्तित राहणार असल्याची माहिती मौलाना मुफ्ती जावेद हुसैनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने काल दारुल उलूम या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला चांद पाशा, आलम अब्दुल रहीम, अब्दुल सत्तार, शाकेर हाफेज, मोहियोद्दीन यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना मौलाना मुफ्ती जावेद हुसैनी म्हणाले की, या मदरशाला साठ वर्षे पुर्ण होत असल्याने या निमित्ताने मदरशात भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साठ वर्षाच्या कालावधीत मदरशातून हुफ्फाज उलमा व अइम्मा यांचा सन्मान हकीमुल इस्लाम यांचे नातू व खतिबुल इस्लाम यांचे उत्तराधिकारी, हजरत मौलाना मोहम्मद सोफियान कासमी कुलगुरु दारुल उलूम देवबंद तसेच पीर ए तरीकत हजरत मौलाना मुहम्मद सलमान बिजनोरी (उस्ताद ए हदीस व अदब दारुल उलूम देवबंद व खलीफ ए अजल महेबुबे, उलमा व सुलहा हजरत मौलाना पीर सैय्यद जुल्फीकार नक्षबंदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानीत करून पारितोषिक दिले जाईल. या कार्यक्रमाला बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील मुस्लिम बांधव, धर्मगुरू उपस्थित राहणार असल्याचे मुफ्ती जावेद हुसैनी यांनी म्हटले आहे.