परळी वैजनाथ ( धीरज जंगले)
परळी तालुक्यातुन जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 फ चे विस्तारीकरण काम अतिशय संथ गतीने सुरू असून या मार्गावरून ये-जा करणार्या चाकरमान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करत प्रवास करावा लागत आहे.या प्रश्नी जिल्ह्याचे खासदार,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदार यांची बैठक होऊन देखील कंत्राटदाराने दिलेल्या सूचनेला पायमल्ली केली आहे.
राष्ट्रीय महामार्गामुळे परळी शहराचा पर्यायी तालुक्याचा विकास होत असून या कामी सूड बुध्दीजिवी प्रमाणे हे काम करणार्या कंत्राटदाराकडून रस्त्याचे काम सुरू आहे.
मागील सहा महिन्यापासून हे काम सुरू असून अद्याप एक किलोमीटर एवढे काम देखील परीपूर्ण झालेले नाही. पर्यायी रस्ता उपलब्ध न करता संपूर्ण रस्ता खोदून काढल्याने वाहन धारकांची चांगलीच तारांबळ उडत आहे.दररोज हजारो चाकरमानी या रस्त्यावरून ये-जा करत असून रस्त्यामुळे होत असलेली गैरसोय लक्ष्यात घेऊन महामार्ग प्राधिकरण अधिकारी, जिल्ह्याचे खासदार डॉ.प्रीतम मुंडे-खाडे व कंत्राटदार यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत डिसेंबर मधील पहिल्या आठवड्यात एकेरी रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण करू असे आश्वासन कंत्राटदाराने दिले मात्र या बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार काम तर सोडाच आहे तो एकेरी मार्ग देखील खोदून त्यावर मुरूम टाकल्याने वाहनधारकांना वाहन चालविणे अवघड बनले आहे. रोजच्या प्रवास करणार्या चाकरमान्यांना आता मणक्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रस्त्याचे अनेक ठिकाणी खोलीकरण एकसारखे नसणे,बेड म्हणून वाण नदी पात्रातील दगड-गोटे वापर, खोदलेल्या रस्त्याचे टाकाऊ साहित्य खोलीकरण केलेल्या ठिकाणी वापर करणे, पाणी टाकून दबाई न करणे असे निकृष्ट काम कंत्राटदाराकडून करण्यात येत आहे.या सर्वाचा कळस म्हणजे प्राधिकरण आणि खासदाराच्या सूचना मिळाल्यावर एकरी वाहतूक सुरळीत न करता आहे तो एकेरी रस्ता देखील खोदून काढला आहे.