Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeसंपादकीयरोखठोक -संतांच्या भूमीत जंताची वळवळ

रोखठोक -संतांच्या भूमीत जंताची वळवळ


संतांच्या भूमीत
जंताची वळवळ
गणेश सावंत -9422742810
शालेय जीवनात कुटाळक्या करायच्या, शिक्षणाच्या नावाने हातवर करायचे, ज्ञानार्जनाचा संबंध येवू द्यायचा नाही, ईश्‍वराने दिलेल्या नरदेहाचा सद्सद विवेक बुद्धीने उपयोग करण्यापेक्षा त्या शरिराचा वार्त्य खोडकर म्हणून उपयोग करायचा. तरूण वयात कुठल्या तरी पक्षाचा झेंडा हातात घ्यायचा, समाजसेवेचा दिखावा निर्माण करायचा, काहीच जमले नाही तर निवडणुकीत उभे रहायचे, तिथेही यश आले नाही पराभवाला सामोरे जावे लागले तर सरळ-सरळ भगवेवस्त्र परिधान करून मोहमायापासून दूर असल्याचे सांगत स्वयंम घोषित संत म्हणून मिरवण्याचा उद्योग सध्या भारतभूमीत मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. ना वेदांचे अर्थ माहित, ना धर्मांची संहिता माहित, ना गिता, गाथा, ज्ञानेश्‍वरीचे अध्याय. केवळ भगवेवस्त्र परिधान करून कपाळी चंदन किंवा कूंंकू लावून अन्य धर्माविषयी बोलायचे किंवा हिंदू धर्मातीलच सर्वश्रेष्ठ व्यक्तींविरोधात चितावनीखोर भाषण करायचे आणि आपले पित्र स्वर्गात पाठवायचे. हा धंदा गेल्या सात वर्षाच्या कालखंडात देशात जास्तच तेजीत आलाय. यामुळे हिंदू धर्म आणि हिंदु धर्मातील साधु, संतांचे पावित्र्य जपले जातेय का? हिंदू धर्मातल्या सहिष्णुतेविषयी जगाच्या पातळीवर कुठला संदेश जातोय? सर्वश्रेष्ठ मानल्या जाणार्‍या हिंदू धर्मातल्या या प्रवृत्तींचा नेमका हेतू काय? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित होत महाराष्ट्रासह भारतभूमीतल्या या संतवचनी पावित्र्यात घाण कोण धुतयं? संतांच्या भूमीत ही जंतांची वळवळ का होतेय? हा सवाल उपस्थित करून याचं उत्तर सर्वसामान्यातील सर्व सामान्य माणसासह धर्म संसदेत वसणार्‍या प्रत्येकाने शोधायलाच हवे. प्रत्येक वेळा भगवेवस्त्र परिधान करून डोक्याच्या झिंज्या वाढवून थेट भारतीय सत्तेला नव्हे तर लोकशाहीला आव्हान देण्याचे प्रयत्न तथाकथीत महाराजांकडून जेंव्हा होतात तेंव्हा अशा भोंदुंच्या मुसक्या बांधणे गरजेचे असते. राष्ट्रपिता महात्मा गांधी विरोधात बोलणारा कोणी बेवडा नव्हता. एखाद्या चावडीवरून राष्ट्रपिता विरोधात गरळ ओकली गेली नाही तर धर्म संसदेच्या व्यासपीठावरून कालीचरन नावाच्या र्निबुद्ध माणसाने म्हणण्यापेक्षा जंताने वळवळ करत गरळ ओकली आहे. त्याच्या आज मुसक्या बांधल्या हे बरच झालं असलं तरी या वाढत्या प्रवृत्ती रोखण्यासाठी यांच्या जिभाच नव्हे तर मस्तकात वळवळणार्‍या जंतांनाही आता ठेचायला हवे. धर्म संसदेत जे झालं ते संतापजनक झालं.
धर्म संसदेत
राष्ट्रपिता महात्मा गांधी विरोधात कालीचरण नावाच्या स्वयंम घोषित संताने जेंव्हा गरळ ओकली, एकेरी भाषेचा प्रयोग करत शिवीगाळ केली. तेंव्हा त्या संत नव्हे तर जंताची छाती फुललेली दिसली. त्याने जणु जग जिंकल्याचा आव करत देशातला पहिला अतिरेकी नथुराम गोडसे याचे गोडवे गायले. कालीचरणची तर मती मारली होती परंतू धर्म संसदेत उपस्थित असणार्‍या लोकांनी जेंव्हा टाळ्या वाजवल्या तेंव्हा स्वयंम घोषित संत नव्हे जंत असणार्‍या कालीचरणमध्ये आणि टाळ्या वाजवणार्‍यांमध्ये फरक तो काय? मात्र अशास्थितीतही एका संताने धर्म संसदेत कालीचरणच्या भाषेचा तिव्र निषेध करत धर्म संसद सोडणे पसंद केले. धर्म म्हणजे काय? कर्माची व्याख्या काय? कर्म म्हणजे काय? कर्माची व्याख्या काय? त्याग म्हणजे काय? त्यागाची व्याख्या काय? मोहमाया म्हणजे काय? त्याची व्याख्या काय? संतत्त्व कोणाला येतं? संताच्या पदरी काय असायला हवं? याचा साधा गंधही नसतांना व्यक्ती जेंव्हा भगवे वस्त्र परिधान करून संतत्त्वाचा आव आणतो तेंव्हा असच काहीसं होतं. धर्म संसदेमध्ये धर्माविरोधात जेंव्हा-केंव्हा होत आलं तेंव्हा धर्म संसद हरली आणि खरा तो धर्म जिंकला याचे अनेक पुरावे या महाराष्ट्र मातीत आणि हिंदुस्तानच्या भूमित सापडतांना दिसून येतील. तथागत गौतम बुद्धांपासून जगद्गुरू संत तुकारामांपर्यंत धर्म संसदेने अथवा कर्मटांनी केलेल्या उपद्वाप जग जाहिर आहे. संत ज्ञानेश्‍वरांना आणि त्यांच्या भावंडांना शुद्धीकरणासाठी धर्म संसदेने दिलेला त्रास सर्वश्रुत आहे. संत तुकारामांना मंबाजीपासून सालोमालोपर्यंत नव्हे-नव्हे तर भट्टांपर्यंत दिलेला त्रास आणि कवेत्त्व हिरावून घेण्याचा प्रयत्न सर्वांनाच माहित आहे. मात्र इथं बुद्ध अजरामर झाले. संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकोबा कळसापर्यंत गेले. धर्म संसद मात्र हरली. त्याचे कारण धर्म संसदेत माणसाला माणसापासून वेगळं करण्याचा केला गेलेला अट्टहास आणि माणसांना माणसांच्या जातीमध्ये पाहून हिंदू धर्माची केलेली अवहेलना जबाबदार म्हणावी लागेल. कर्मकांड करणारे धर्मांध जेंव्हा बोटावर मोजण्या इतक्या जातींना सर्वश्रेष्ठ मानत हिंदूंचा अभिमान बाळगतील अन् अन्य अठरापगड जातीतील बहुजनांना हिनवतील तेंव्हा हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म कसा आहे? हा सवाल डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून छत्रपती शाहु महाराज हे विचारल्याशिवाय राहणार नाहीत. तेंव्हाही धर्म संसदेला वेदाचा अर्थ आम्हासी ठावा म्हणणारे तुकाराम होते आणि आताही धर्म संसदेच्या व्यासपीठावरून राष्ट्रपित्यांना शिवीगाळ करणार्‍या तथाकथीत संत नव्हे जंताचा निषेध करणारे अन्य साधूही पहायला मिळाले.
कोण आहे हा कालीचरण?
गेल्या दोन-तीन वर्षापूर्वी कुंकवाच्या रंगाचे लाल भडक कपडे परिधान केलेला, कपाळी भले मोठे कुकूं लावले, अंगापिंडाने दांडगा असलेला एक व्यक्ती पुरातन शिव मंदिरात शिवतांडव स्तोत्र म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओमधला तो व्यक्ती आणि त्याच्या आवाजातले शिवतांडव स्तोत्र देशवासियांच्या हृदयाला एवढे भिडले की तो प्रत्येकाच्या लक्षात राहिला. मुँह मे राम, बगल में छुरी असेल असे कोणाला वाटलेही नाही. संतत्व कसे असावे? संतांचा देह कसा असतो? यावर विज्ञान युगातल्या आजच्या तरूणांनी चर्चा करत कालीचरणला आपले हिरो केले. मात्र हाच कालीचरण जेंव्हा धर्म संसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधींना शिवीगाळ करतो आणि नथुराम गोडसेचा उदो-उदो करत आपले खायचे दात दाखवतो तेंव्हा नाही निर्वळ जीवन काय करील साबण, वृक्ष न धरी पुष्पफळ काय करील वसंत काळ, वांझे न होती लेकरे काय करील भ्रतारे, नपुंसक नवर्‍याशी काय करील बाईल त्यासी हा अभंग आठवल्याशिवाय राहत नाही. ज्याचं अंत:करण शुद्ध नाही त्याने कुठल्याही साबणाने अंघोळ केली तर उपयोग नाही. एखाद्या वृक्षाला फळच येत नसेल तर कित्येक वसंत काळ आले तरी त्याचा उपयोग काय? आणि एखादी बाई वांझ असेल तर त्यात तिच्या नवर्‍याचा दोष तो काय? आणि एखादा नवरा नपुंसक असेल तर त्याच्या बायकोपासून आपत्याची अपेक्षा ती काय करावी? तशीच वृत्ती कालीचरण याची दिसून आली. दुर्दैवं याचं वाटतं, महात्मा गांधींना गोळ्या घालणारा अतिरेकी नथुराम गोडसे हा महाराष्ट्र मातीतला असल्याने तेंव्हाही सह्याद्रीची मान शरमेने खाली गेली आणि महात्मा गांधींना शिवीगाळ करणारा संत नव्हे जंत हा महाराष्ट्रातल्या मातीतला आकोल्यातला असल्याने आताही महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली म्हणण्यापेक्षा अशा निर्लज्ज व्यक्तीच्या वक्तव्याने काजळी लागली. गेल्या सात वर्षाच्या कालखंडामध्ये अखंड हिंदुस्तानात ज्या पद्धतीने भगवे वस्त्र परिधान करून संतत्त्वाचा आव आणणार्‍या जंतांची वळवळ ही अखंड महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्तानच्या अखंडतेला जेवढी विषवल्लीसारखी आहे तेवढीच हिंदू धर्माच्या सत्यत्वाला आणि सहिष्णुतेला मारक ठरणारी म्हणावी लागेल.
ऐसे संत झाले कळी,
तोंडी तंबाकूची नळी!
या अभंगात संत तुकोबांनी संत म्हणून घेणार्‍या तथाकथीतांचा भांडाफोड केला. ज्याच्या तोंडामध्ये नेहमी चिलीम भरलेली असते अशा लोकांनी स्नान संध्याचे आचरण बुडविल्याचे सांगत ईश्‍वराचे व्यसन नव्हे तर मोहमायेचे व्यसन त्यांच्या अंगअंगात भिनल्याचे दाखवून दिले आहे.
टिळा,टोपी घालूनिया माळा । म्हणती आम्हा साधू ॥
दया, धर्म चित्त नाही । ते जाणावे भोंदू ॥
कलयोगी घरोघरी । संत झाले फार ॥
वितभर पोटासाठी । हिंडती दारोदार ॥
ज्याच्या मनात प्राणीमात्रा बद्दल दया नसते, माणुस धर्म काय आहे? हे माहित नसते, सत्त्याला त्याच्याकडे कधीच महत्त्व दिले जात नाही. तो टिळा, टोपी, माळ घालून साधू जरी झालेला असला तरी तो ढोंगी, लबाड असतो आणि वितभर पोटासाठी दारोदार बिनलाज्यासारखा वक्तव्य करत हिंडत असतो. मुखी सांगे ब्रह्मज्ञान । जनी लोकाची कापीतो मान, ज्ञान सांगतो जनाशी । नाही अनुभव आपणाशी, कथा करीतो देवाशी । अंतरी आशा बहुलोभाची, तुको म्हणे तोची वेडा । त्याचे हाणुनी थोबाड फोडा अशा तथाकथीत संत नव्हे जंतांचे थोबाड फोडण्याची संत तुकोबांनी तुम्हा, आम्हाला शिकवलं आहे. भगवे वस्त्र परिधान करणे अथवा पाठांतरातून शिवतांडव स्तोत्र गाणे म्हणजे तो सर्वश्रेष्ठ संत ठरत नाही. एकीकडे हिंदुत्त्व आणि हिंदू या दोघांची व्याख्या वेगवेगळी होत असतांना दुसरीकडे
जंतांचं पांघरून
भगव्या वस्त्राने घेवून आज व्यवस्थेला या देशात जेंव्हा आव्हान दिलं जातं तेंव्हा अशा प्रवृत्ती विरोधात बोलावं लागतं. गेल्या दशकभरामध्ये असे भगवे वस्त्र परिधान करणारे धांदाल खोटारडे कित्येक संत आपल्या कुकर्माने नागवे झाले आणि भारतीय संविधानाच्या कलमाखाली आतमध्ये जावून बसले. बलात्कारी संत नव्हे जंत इथेच जन्मले. व्यवस्थेला आव्हान देत बंदुंकांच्या जोरावर भारतीय पोलीस दलाला नव्हे-नव्हे तर भारतीय सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देणारे संतही इथेच पहायला मिळाले. रामरहिमसारखा जंतही इथेच मिळून आला आणि
आता हा कालीचरण
आपल्या मुखमुतारीतून आतमध्ये गेला. धर्म संसदेत काय असायला हवं हे सांगण्याचा अधिकार आमचा नाही. संतत्व बहाल असणारे अनेक अभ्यासू संत आजही या भूमीत आहेत, त्यांचे कार्य आकाशाएवढे आणि सागराएवढे विशाल आहे. त्यामध्येही दुमत नाही. परंतू राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचाराला विचाराला पाचोळाभरही नसणारे काही नथुचेभक्त जेंव्हा नाकात नथं घालून टाळ्या वाजवतात तेंव्हा त्यांचा पंत सांगण्याची आम्हाला गरज वाटत नाही. महात्मा गांधी कोण हा सवाल करणं मुर्खपणाच. आम्ही तर म्हणून अहिंसेचा हा शूर संतापेक्षा कमी नव्हता. महात्मा गांधींचं उभं आयुष्य माणसाने माणसासारखा माणसासोबत रहावं असं होतं. तिथं अशा कालीचरणाच्या उपद्वापाने त्यांचं कार्य खुजं होणार नाही. परंतू अशा कालीचरणला साथ देणारे आणि नथुरामचे उदो-उदो करणार्‍यांचा पाठीराखा करणारे भविष्यात या संतांच्या भूमीत जंत म्हणूनही वळवळ करू शकणार नाहीत हे त्रिवार सत्य असलं तरी ही वळवळ थांबवण्यासाठी आता सर्वांनीच अशावेळी विद्रोही पवित्रा उतरायला हवा.

Most Popular

error: Content is protected !!