नागपूर (रिपोर्टर): पंकजा मुंडे भाजपच्या बड्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले तर आनंदच होईल, पण याविषयीचा कोणताही निर्णय आमचे वरिष्ठ नेतेच घेतील, असे मत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानामुळे पंकजा मुंडे आता महाराष्ट्राबाहेर दिल्लीच्या राजकारणात दिसून येतील असा दावा केला जात आहे.
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने काही आमदार व मंत्र्यांना निवडणुकीमध्ये उतरवले होते. त्यातील बहुतांश मंत्री आणि खासदार विधानसेत निवडून देखील आलेले आहेत. हाच पॅटर्न लोकसभेमध्ये वापरला जाणार आहे. बड्या नेत्यांना लोकसभेचे तिकिट दिले जाणार आहे. राज्यातील जास्तीत जास्त जागा निवडून कशा आणता येतील याची व्यूहरचना भाजप आखू लागला. बड्या नेत्यांपैकी पंकजा मुंडे यांना देखील बीडमधून भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसे संकेत प्रवीण दरेकर यांनी दिले आहेत.