बीड / प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यात एकूण 9 जागेसाठी कोतवाल पदाकरिता अर्ज मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने निवड प्रक्रिया सप्टेंबरमध्ये पार पडली. त्यामध्ये तालुक्यातील कोतन येथील कोतवाल पदासाठी मोनिका सोपान जाधव यांनी अनुसूचित जातीचे खोटे प्रमाणपत्र काढून कोतवाल पदाची नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कलम 420, 467, 468 नुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी तक्रार राणी दत्तात्रय साठे यांनी बीड जिल्हाधिकारी, उप विभागीय कार्यालय पाटोदा, तहसीलदार पाटोदा, उप विभागीय अधिकारी बुलढाणा, जिल्हा जात पडताळणी समिती बुलढाणा यांच्याकडे केली आहे.त्यामुळे पाटोदा तालुका कोतवाल भरती वादात सापडली आहे.
कोतवाल पदासाठी मोनिका सोपान जाधव राहणार पाटोदा, जिल्हा बीड यांनी अर्ज केला होता. त्यामध्ये त्यांना कोतन या ठिकाणी कोतवाल पदासाठी नियुक्ती देण्यात आली आहे. सदरील नोकरी त्यांनी अनुसूचित जातीचे खोटे जात प्रमाणपत्र काढून मिळवली आहे.तरी सदरील नियुक्ती रद्द करुन प्रतिक्षा यादीतील क्रमांक दोनचे उमेदवार राणी दत्तात्रय साठे यांना नियुक्ती देण्यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनास दिलेल्या तक्रार अर्जात नमूद करण्यात आलं आहे की,मोनिका सोपान जाधव यांनी कोतवाल पदासाठी सादर केलेली कागदपत्रे पूर्णतः खोटी असल्याचे आढळून आले आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणात जिल्हाधिकारी बीड व बुलढाणा जिल्हा प्रशासन यांनी योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी तक्रार देण्यात आली आहे.