बीड (रिपोर्टर): कॉपी करण्याच्या उद्देशाने कानात ब्ल्यूटूथ घालून कमरेला इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस घेऊन जात असताना एका परीक्षार्थ्याला राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस निरीक्षक रंगेहात पकडत पोलिसांच्या स्वाधीन त्याच्या साथीदारासह केले. त्याच्यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये भा.दं.वि. कलम 420 आणि कॉपीराईट अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आज बीड शहरात टीसीएस कंपनीकडून राज्य उत्पादन शुल्क विभागातील वाहनचालक आणि जवान या पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. बीड शहरातील चर्हाटा फाटा या ठिकाणी स्वामी विवेकानंद संगणक केंद्रावर या परीक्षा सुरू आहेत. सकाळी अकरा वाजता परीक्षा विद्यार्थी परीक्षा कक्षा सोडत असताना एका विद्यार्थ्याकडे कानात ब्ल्यूटूथ आणि कमरेला इलेक्ट्रॉनिक साधन घेऊन परीक्षा कक्षात शिरत असताना राज्य उत्पादन शुल्काचे पोलीस निरीक्षक कुरेशी यांना हा विद्यार्थी आढळून आला. त्याच्या सोबत या परीक्षेशी कसलाही संबंध नसलेला एक मित्रही होता. तात्काळ कुरेशींनी या विद्यार्थ्याला ताब्यात घेत बीड ग्रामण पोलीस ठाण्यात हजर केले. कुरेशी हे याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये संबंधित विद्यार्थी आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.