आष्टी, पाटोदा, शिरूर, वडवणी, केज नगरपंचायतीसाठी दुपारपर्यंत
सरासरी ४५ ते ६५ टक्के मतदान आमदार, खासदारांसह माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
आष्टी/पाटोदा/वडवणी/केज/शिरूर (रिपोर्टर) आगामी जि.प., पं.स. नगरपालिका सारख्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पाहितल्या जाणार्या बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, वडवणी नगरपंचायतीच्या उर्वरित प्रत्येकी चार जागेसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी ४५ ते ६५ टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. या निवडणुकीमध्ये उमेदवारापेक्षा जिल्ह्यातील मातब्बर आमदार, खासदार यांची प्रतिष्ठा पणाला लागून आहे. जिल्हा परिषदेवर वर्चस्व स्थापन करू पाहणार्या धस, सोळंकेंचं महत्व याच निवडणुकीतून समोर येणार आहे. उद्या या पाचही नगरपंचायतींच्या मतदानाची मोजणी होऊन निकाल घोषीत होणार आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर, वडवणी, केज नगरपंचायतीच्या प्रत्येकी चार जागांसाठी आज सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली. आष्टी, पाटोदा, शिरूर या नगरपंचायतींमध्ये विधान परिषदेचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी आमदार बाळासाहेब आजबे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ही निवडणूक या मातब्बर नेत्यांसाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी रंगीत तालीम असेल. आज दुपारपर्यंत या तिन्ही नगरपंचायतीत ४५ ते ६५ टक्के मतदान झाले होते. इकडे केज नगरपंचायतीमध्ये खा. रजनीताई पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख बजरंग सोनवणे, आघाडीचे हारुण इनामदार यांच्या पॅनलमध्ये रंगीत तालीम होत असून दुपारी एक वाजेपर्यंत केज येथे चार जागांसाठी ५० टक्केच्या आसपास मतदान झाले होते.