धनंजय म्हणाले, आजचा दिवस अभिमानाचा तर पंकजा म्हणाल्या, मुंडे-महाजनांची आठवण येते
परळी (रिपोर्टर): अयोध्येत उद्या प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने अवघा देश राममय झाला असून त्यानिमित्ताने परळीत आज पंचम ज्योतिर्लिंग परळी वैद्यनाथ लोकोत्सव समिती मार्फत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खा. प्रितम मुंडे या मोठ्या उत्साहाने सहभागी होत्या. मुंडे बंधू-भगिनी पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रीत आल्याचे पहावयास मिळाले. या वेळी धनंजय मुंडे यांनी आजच्या दिवशी देशातील प्रत्येक नागरीकाची जेवढी भावना आहे तीच भावना आपली असल्याचे सांगत त्या काळच्या लढाईत आमचे सर्व कुटुंब सक्रिय असल्याचे सांगत आमच्या भावना अधिकच्या असू शकतात. ज्यांनी तो सर्व काळ पाहिला आणि उभारणी पाहिली त्यांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हटले. तर पंकजा मुंडे यांनी आज स्व. गोपीनाथराव मुंडे आणि स्व. प्रमोद महाजन यांची आठवण येत असल्याचे सांगितले.
अयोध्येमध्ये उद्या प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यानिमित्ताने अवघा देश राममय झाला आहे. शासकीय सुट्टीपासून ते प्रत्येक घरात दिवाळी साजरी करण्यापर्यंत तयारी सुरू आहे. त्यानिमित्ताने आज परळीमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली. प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरापासून ही शोभायात्रा वाजत-गाजत निघाली. अवघी परळी सजवण्यात आली होती. ज्या रस्त्यावरून ही शोभायात्रा जाणार होती त्या रस्त्यांवर सडा, रांगोळी काढण्यात आली होती. मृदंगाची थाप, टाळांचा निनाद, प्रभू रामाच्या जयघोषणाने अवघी परळी दुमदुमून गेली होती तर दुसरीकडे या शोभायात्रेमध्ये राज्याचे कृषीमंत्री तता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खा. प्रितम मुंडे हे एकत्रित दिसून आले. या शोभायात्रेचे मुंडे-बंधू-भगिनी आकर्षक केंद्रबिंदू ठरले. या वेळी धनंजय मुंहे म्हणाले की, माझे वडील आणि माझे काका यांनी अनेक वर्षे कारसेवक म्हणून काम पाहिले. आजचा दिवस स्वाभावीक प्रत्येकाची जी भावना आहे तीच भावना माझी आहे. कदाचित त्या काळच्या लढाईमध्ये आमचे सर्व कुटुंब असल्यामुळे आज आमच्या भावना अधिकच्या असू शकतात. प्रभू रामाचे अयोध्येत मंदिर निर्माण होणे आणि उद्या त्याची प्राणप्रतिष्ठापणा होणं ज्यांनी हे सर्व पाहिलं आणि उभारणी पाहिली त्यांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे, असं मुंडे म्हणाले तर पंकजा मुंडे यांनी स्व. मुंडेंची आठवण सांगताना मुंडे साहेब कारसेवक म्हणून गेले होते. तेव्हा ते चित्रकुटमध्ये दोन दिवस अडकले, आम्हाला प्रचंड चिंता वाटत होती, त्यांचा संपर्क होत नव्हता. त्या काळी अडवाणींच्या रथयात्रेत मी दोन दिवस होते. तेव्हा अकरा-बारा वर्षाची असेल. आज मुंडे-महाजनांची आठवण येत असल्याचे त्यांनी म्हटले. ही शोभायात्रा विाजी चौकात आल्यानंतर तिचा समारोप झाला.