बीड (रिपोर्टर): एकीकडे जास्त व्याजदराच्या आमिषापोटी बीड शहरासह जिल्हाभरातील नागरीकांचे कोट्यवधी रुपये मल्टिस्टेट आणि क्रेडीट सोसायटीमध्ये अडकलेले असताना दुसरीकडे जादा परताव्याच्या आमिषाला आणखी लोक बळी पडत असून शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देतो, म्हणून सेकवॉ या शेअर मार्केट कंपनीने केज येथील शिक्षकाला तब्बल 11 लाख 9 हजार 500 रुपयांना गंडवल्याचे उघडकीस आले आहे तर अन्य एका सायबर गुन्ह्यात गेवराई तालुक्यातील तळेवाडी येथील 36 वर्षीय इसमास 99 हजार 999 रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन्ही प्रकरणात बीड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज शहरातील विठाईपुरम भागात राहणारे 40 वर्षीय शिक्षक सेनल महेंद्र मिश्रा हे गेल्या काही दिवसांपूर्वी फेसबुक ही सोशल साईट पहात असताना त्या साईडवर सेकवॉ शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीची जाहीरात दिसून आली. त्यावर त्यांनी क्लिक करत संबंधितांशी संपर्क साधला असता त्यांनी मिश्रा यांना वॉटस्अॅप ग्रुपमध्ये अॅड केले आणि शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देतो म्हणत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले. या वेळी संबंधित सेकवॉ कंपनीकडून 5 मोबाईल क्रमांकाद्वारे पैसे मागण्यात आले. विविध बँक खात्यावर संबंधित शिक्षकाने तब्बल 11 लाख 9 हजार 500 रुपये भरणा केला. मात्र काही दिवसानंतर सदरील शिक्षकास आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बीड सायबर पोलिसात याबाबत तक्रार दिली. तेव्हा सायबर पोलिसांनी शिक्षक सेनल महेंद्र मिश्रा यांच्या फिर्यादीवरून संबंधित पाच मोबाईल नंबर व सेकवॉ शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी चालकाविरुद्ध गु.र.नं. 05/2024 कलम 420, 34 भा.दं.वि.सह माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 कलम 66, 66 क, 66 ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसरी ऑनलाईन फसवणूक गेवराई तालुक्णयातील तळेवाडी येथील लक्ष्मण लहूराव सजगणे यांची झाली. त्यांच्या बँक खात्यातून अज्ञाताने 99 हजार 999 रुपये काढून फसवणूक केली. या प्रकरणी लक्ष्मण सजगणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गु.र.नं. 6/2024 कलम 420 भा.दं.वि.सह माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 66 66सी अन्वये दाखल करण्यात आला आहे. तर तिसरी ऑनलाईन फसवणुकीची घटना बीड शहरात उघडकीस आली. शहरातील स्वराज्य नगर भागात सलुनचा व्यवसाय करणारे शंकर सुभाष गवळी यांना अज्ञाताने बिझनेस लोन, मुद्रा लोन करून देतो, असे सांगून वारंवार त्यांच्याकडून ऑनलाईन फसवणूक करत 81 हजार रुपये लुबाडले. या प्रकरणी गवळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात सायबर क्राईममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












