बीड तालुक्यातील मराठा समाज कुठल्याही
राजकीय स्टेजवर जाणार नाही
समाजाने घेतली आज बैठक; बैठकीत 11 निर्णय घेण्यात येणार
बीड (रिपोर्टर): राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले असून या आरक्षणाला आमची सहमती नसून आमच्या हक्काचे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी करत आज बीड तालुक्यातील मराठा समाजाने एक बैठक घेऊन तालुक्यातील मराठा समाज कुठल्याही राजकीय सभेला जाणार नाही किंवा पुढार्यांच्या स्टेजवरही जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये अकरा अधिकृत ठराव घेण्यात आले आहेत.
राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाची घोषणा केली आहे. मात्र हे आरक्षण मान्य नसून सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे व सगे-सोयरे कायदा तात्काळ लागू करण्यात यावा, अशी मागणी जरांगे पाटलांकडून केली जात आहे. शासन जोपर्यंत सदरील ही अमलबजावणी करत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे जे आंदोलने सुरू आहेत ते सुरुच राहणार आहेत. आज बीड शहरामध्ये तालुक्यातील मराठा समाज बांधवांची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये अकरा अधिकृत ठराव घेण्यात आले आहेत. यामध्ये मराठा समाज कोणत्याही राजकीय सभेला जाणार नाही किंवा राजकीय पुढार्यांच्या स्टेजवर जाणार नाही, 10 टक्के आरक्षणाला मराठा समाजाची सहमती नसून आमच्या हक्काचे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे व सगळे सगेसोयरे कायदा तात्काळ लागू करण्यात यावा, मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या पाठिशी तालुक्यातील मराठा समाज तन-मन-धनाने उभा आहे व राहील. नमुना नंबर 33, 34 वरील कुणभी नोंदी शोधणारे मोडी लिपी तज्ञ संतोष यादव यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते संमत झाला. संविधानिक आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला तर सर्व समाज जेलभरो आंदोलन करेल, साखळी उपोषण संविधानीक मार्गाने केले जातील, बीड तालुका समिती सर्वसामान्य जनतेला, व्यापार्यांना त्रास होईल, असे आंदोलन समिती करणार नाही. आपण समाज म्हणून संघटीत राहावे, सर्व समाज बांधवांनी राज्यपाल, राष्ट्रपती यांना लेखी व मेलद्वारे निवेदन द्यावेत, बीड तालुका समिती कुठलेही असंविधानिक आंदोलन करणार नाही, परंतु समाजातील बांधवांना विनाकारण गोवण्याचा किंवा प्रशासनाने कुठलाही दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास सर्व समाज रस्त्यावर उतरेल, कुणबी प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया खंडीत झाली असून ती प्रक्रिया पहिल्याप्रमाणे चालू ठेवावी, असे अधिकृत ठराव सकल मराठा समाज बीड तालुका समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आले.