बीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यासह राज्यभरात ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले. कुठल्या ना कुठल्या कारणावरुन सर्वसामान्यासह शासकीय नोकरदारांची फसवणुक होत आहे. तुमच्या क्रेडीट कार्डची लिमीट वाढवण्यासाठी अॅप डाऊनलोड करा असे सांगून एका भामट्याने शासकीय कर्मचार्याच्या खात्यावरील 5 लाख 63 हजार 742 रुपयाची फसवणूक केली असल्याचे समोर आले. याप्रकरणी बीड सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडूरंग चंद्रकात गादेकर रा.सारनाथ नगर, अंबाजोगाई यांना एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरुन फोन करुन तुमच्या आयसीसी बँकेच्या के्रडीट कार्डची लिमीट वाढवण्यासाठी आय मोबाईल पे अॅपलीकेशन डाऊनलोड करण्यासाठी सांगितले. गादेकर यांनी अॅपलीकेशन डाऊनलोड केल्यानंतर त्यांच्या खात्यातील 5 लाख 63 हजार 742 रुपये काढून घेण्यात आले. आपली फसवणूक झाल्याची त्यांच्या निर्देशनास आल्यानंतर त्यांनी बीडच्या सायबर कडे तक्रार दाखल केली. त्यानूसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान काही दिवसापासून असे फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नागरीकांनी आपली वैयक्तीक बँकेतील माहिती इतरांना देवू नये असे आवाहन बँका, सायबर क्राईम, पोलीस प्रशासन करत असतांनाही काही लोक चूक करत आहे. भामट्यांनी केलेल्या कॉलला बँकेची माहिती सांगत असल्याने फसवणुकीचे प्रकार वाढले आहे.