बीकेसीमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत शिंदे-फडणवीस-पवाांची बैठक
मुंबई (रिपोर्टर): 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 400 पारचे मनसुबे आखणार्या भाजपाने महाराष्ट्रामध्ये निवडून येणार्या जागाच शिंदे आणि अजित पवारांना देण्याचे ठरवले असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. भाजप 32 जागांवर ठाम असून शिंदेंना 12 जागा तर अजित पवारांना 4 जागा दिल्या जाणार आहेत. मात्र शिंदे आणि पवार हे आणखी काही जागांसाठी शहांसोबत चर्चा करत आहेत. परंतु महाराष्ट्रात भाजपाने ‘नो रिस्क’ धोरण आखल्याने ज्या ठिकाणी शिंदे-पवारांचे खासदार निवडून येतील त्या ठिकाणीच त्यांना जागा दिल्या जाणार असल्याचे धोरण भाजपाने आखले आहे.
मुंबईमध्ये देशाचे गृहमंत्री अमत शहा हे तळ ठोकून आहेत. आज सकाळपासून बीकेसीमध्ये ते नेत्यांसोबत बैठकांवर बैठका घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला कुठल्या जागा द्यायच्या, त्यांची मागणी कितीची यापेक्षा शिंदे-पवारांचे खासदार शंभर टक्के निवडूनच कुठे येतात त्याच जागा त्यांना द्यायच्या या भूमिकेत भाजप आहे. आज शहा यांनी अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा केली. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यासोबतही चर्चा केली. त्यानंतर अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये महत्वपुर्ण चर्चा झाली. सरशेवटी सुत्रांच्या माहितीनुसार भाजपा 32 जागांवर ठाम असून शिंदेंना 12 तर अजित पवारांना 4 जागा देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते. भाजप आपली यादी येत्या दोन दिवसात जाहीर करण्याची शक्यता आहे मात्र जागा वाटपावरून शिंदे-पवार आणि भाजपात ओढाताण होण्याची दाट चिन्हे दिसून येत आहेत. भाजपाला 400 पारसाठी महाराष्ट्रात कुठलीही रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे भाजप जिथे तुमचे उमेदवार निवडून येणार तिथेच तुम्ही उमेदवार्या घ्या या भूमिकेत आहे.