बीड, (रिपोर्टर)ः-लोकसभा निवडणुकीचे बिगूल कुठल्याही क्षणी वाजणार असल्याने राज्यातल्या राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या जिल्ह्यांमध्ये कुठला पक्ष सरस ठरणार यावर चर्चा होत असतानाच अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष बीड जिल्ह्याकडे लागून आहे. मराठा आरक्षण आंदोलनाने बीड जिल्ह्यात पक्षीय मतापेक्षा जातीय मतांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाल्याने बीड जिल्ह्यात पक्षापेक्षा जातीय समीकरणातून एखादा क्लिन उमेदवार समोर आला तर त्याचा बेडापार होईल, ती संधी वंचीत आणि एमआयएमकडे प्रामुख्याने दिसून येत आहे. बीड जिल्ह्यात मुस्लिम समाजाची वोटींग अडीच लाखापेक्षा अधिक असून वंचीत आणि एमआयएम हे एकत्रित आले आणि त्यांनी लोकसभेच्या रणांगणात उतरून संधीचे सोने करून घेतले तर हा अनोखा प्रयोग संभाजीनगरमध्ये ज्या पद्धतीने इम्तियाज जलील निवडून आले तसा निकाल बीडचा लागू शकतो, असा कयास जानकार काढत आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. भाजपाने विद्यमान खासदार प्रीतम मुंडेंना डावलून पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली आहे. या वेळेस बीडमध्ये पंकजा मुंडेंना कडवा विरोध करणारे राष्ट्रवादीचे धनंजय मुंडेंसह सर्वच नेते भाजपाशी युतीत असल्याने सध्या पंकजा मुंडेंचं पारडं जड दिसतं मात्र मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी उभा केलेल्या आंदोलनाने बीड जिल्ह्यातला सर्वात मोठा मतदार मराठा हा भाजपापासून दुरावल्याचे चिन्ह आहे. अशा स्थितीत शरद पवार हे पक्षापेक्षा पक्षाबाहेरील मराठा उमेदवार शोधू पाहत आहेत. तर दुसरीकडे धनगर समाजाची नाराजगी यामुळे बीड जिल्ह्यात पक्षीय मतापेक्षा जातीय मतांच्या समीकरणाला अधिक महत्व प्राप्त झालं आहे. अशा निर्णायक जातींच्या मतांकडे आता सर्वच पक्षांचे लक्ष लागून असल्याने एमआयएम आणि वंचीत या दोन पक्षांनी बीड जिल्ह्यात युती केली तर जातीय मतांच्या समीकरणात एमआयएम वंचीतचा उमेदवार अत्यंत भारदस्त होण्याचे चिन्ह दिसून येत असल्याचे जानकारांचे मत आहे. बीड जिल्ह्यात मुस्लिम समाजाचे मते हे अडीच लाखांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येते. तेवढ्याच तोडीस दलित समाजाचे मतेही आहेत. आणि त्यात मराठा समाज हा भाजपाविरोदात जात असल्याचा सूर दिसून येत आहे. अशा स्थितीत मतांची विभागणी आणि त्या विभागणीतून मुस्लिम-दलित मतांचा गठ्ठा हा एमआयएम-वंचीत उमेदवाराच्या पदरी पडला तर बीड जिल्ह्यात आश्चर्यकारक निकाल लागू शकतो. या बीड जिल्ह्याने जिल्हाबाहेरील नाना पाटलांसारख्या उमेदवाराला स्वीकारले. एवढेच नव्हे तर अवघ्या जिल्ह्यावर एकहाती सत्ता असलेल्या स्व. केशरकाकु क्षीरसागरांचा पराभव जिल्हाबाहेरील बबनराव ढाकणेंनी केला. तो बीड जिल्ह्याच्या मतदारांच्या मदतीनेच. ज्या पद्धतीने संभाजीनगरमध्ये 2019 साली एमआयएमचे इम्तियाज जलील हे विजयी झाले तसा प्रयोग वंचीत आणि एमआयएमने एकत्रितपणे बीडमध्ये येऊन केला तर तो विजयाचे तोरण बांधू शकतो. असे विविध राजकीय जानकारांचे मत आहे. भाजपाने उमेदवार घोषीत केेलेला असला तरी ही निवडणूक भाजपा विरुद्ध जनता अशी होणार असल्याने जातीय समीकरणातल्या मतांना बीड जिल्ह्यात प्रचंड महत्व प्राप्त होणार आहे.












