बीड (रिपोर्टर): भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे या काल औरंगपूर शिवारातील पावनधाम या ठिकाणी गेल्या असता त्यांच्यासमोर मराठा आरक्षणासंदर्भात घोषणाबाजी करण्यात आली होती. यामुळे पोलिसांनी लाठीमारही केला होता. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
भाजपाच्या उमेदवार पंकजाताई या काल केज तालुक्यातील औरंगपूर शिवारातील पावनधाम मंदिरामध्ये गेल्या होत्या. त्याठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या गाडीसमोर येऊन काही कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घोषणाबाजी केली होती. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घोषणा देणार्यांवर पोलिसांनी लाठीमारही केला होता. युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे समुद्रे यांच्या फिर्यादीवरून दीपक दिगांबर करपे, गणेश विठ्ठल करपे, शिवाजी ऊर्फ सतीश करपे, संदीप अंकुश करपे, निलेश वसंत करपे, भैय्या संजय गायकवाड, अक्षय जनक करपे, अमोल श्रीराम करपे, अभिषेक अविनाश करपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.