अंबाजोगाई (रिपोर्टर): भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे आज अंबाजोगाई तालुका दौर्यावर असून त्यांनी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले. या वेळी पंकजा यांनी योगेश्वरी देवीकडे आशीर्वाद मागितले. स्व. गोपीनाथराव मुंडे हे नवरात्रामध्ये हमखास देवीच्या दर्शनाला येत होते. ते देवीचे निस्सीम भक्त होते अशी आठवणही या वेळी पंकजा मुंडे यांनी काढली. त्यानंतर त्यांनी शहरातील मान्यवरांच्या भेटीगाठीला सुरुवात केली.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या चार ते पाच दिवसांपासून भाजपा उमेदवार पंकजा मुंडे या जिल्हाभरात भेटीगाठी घेत आहेत. गेल्या चार दिवसांच्या कालखंडात बीड, गेवराई, केज तालुक्यात त्यांनी प्रतिष्ठीतांच्या भेटीगाठी घेत मतदारांशी ंसंवाद साधला. आज त्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये आहेत. येथे त्यांनी सर्वप्रथम योगेश्वरी देवीच्या मंदिरात जाऊन भक्तीभावाने साडी-चोळी चढवत देवीचे दर्शन घेत आशीर्वाद मागितले. या वेळी माध्यमांशी बोलताना पंकजा म्हणाल्या, स्व. गोपीनाथराव मुंडे हे योगेश्वरी देवीचे निस्सीम भक्त होते. ते नवरात्रामध्ये हमखास देवीच्या दर्शनासाठी यायचे. दर्शन घेतल्यानंतर पंकजांनी शहरातील मान्यवरांसह व्यापारी, डॉक्टर आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. त्यांनी सकाळी पापा मोदी यांची भेट घेतली.