नाळवंडी नाका परिसरात घडली घटना
परस्परविरोधात गुन्हे दाखल
बीड (रिपोर्टर): प्लॉटवरून दोन गटात वाद निर्माण झाला. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर लोखंडी रॉड व तलवारीने मारहाण केली. यात काही जण जखमी झाले. ही घटना नाळवंडी नाका परिसरात घडली. या प्रकरणी परस्परविरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दिलावर नगर भागात असलेल्या प्लॉटवरून शेख जमील आणि सफोवन खान यांच्यात वाद आहे. सदरील हा वाद कोर्टामध्ये सुरू आहे. प्लॉटच्या वादातून काल दोन्ही गट आमनेसामने आले. नाळवंडी नाका परिसरात दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर लोखंडी रॉड व तलवारीने मारामारी केली. यात काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शेख जमील शेख निजाम यांच्या फिर्यादीवरून आरोपी सफोवन खान महेबूब खान यांच्या विरोधात कलम 147, 141, 148, 149 सह आदी कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान शेख जमील यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गाडी आडवी लावून आपणास लोखंडी रॉड व तलवारीने मारहाण केली आहे तर सफोवन खान यांनीही फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून शेख जमील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेख जमील यांनी ईनोवा गाडीला डॅश देऊन आपणास तलवारीने मारहाण केली. या प्रकरणी शेख जमील यांच्या विरोधात 307, 507, 324 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास ठाण्याचे मोदीराज हे करत आहेत.












