मुंबई (रिपोर्टर) सध्या देशभरात एकाच सिनेमाची जोरदार चर्चा आहे, तो म्हणेज ’द काश्मिर फाईल्स’. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या सिनेमात १९९० साली काश्मिरी पंडितांसोबत झालेला नरसंहार,त्यांना आपली स्वतःची भूमी सोडून काश्मिरमधनं करावं लागलेलं पलायन याचं विदारक चित्र नव्हे सत्य या सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पण आता या सिनेमाच्या कथानकावरनं राजकीय गोटात दोन गट पडलेले दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील सिनेमा पाहिल्यानंतर त्याचं तोंडभरून कौतूक केलंय. त्यांनी सिनेमाचं कौतूक केलेला एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झालाय. ज्यात ते म्हणतायत,’’सिनेमा चांगला झालाय,सत्य दाखवण्यात आलं आहे. पण आता मोदींच्या या व्हिडीओनंतर बालीवूडच्या एका दिग्दर्शकाने त्यांना सोशल मीडियावर एक प्रश्न विचारात मोठी मागणीही केलेली आहे. त्याने मोदी आणि केंद्र सरकारला आव्हान करत गुजरात फाईल्स’ सिनेमाची मी निर्मिती करतो,तुम्ही फक्त तो प्रदर्शित करायची परवानगी द्या,अशी मागणी केली आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विनोद कापरी यांचं ट्वीट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी म्हटलं आहे,’’मी गुजरात फाईल्स सिनेमा बनवण्यास तयार आहे. फक्त गुजरातमध्ये जे काही घडलंय ते सगळं सत्यकथन मी जर सिनेमात केलं तर तो कोणत्याही हिंसक अडचणीविना प्रदर्शित होईल याची हमी आपण द्याल का असा सवाल विनोद कापरी .यांनी थेट नरेंद्र मोदींना केला आहे. आणि देशासमोर तुम्ही मला हे आश्वासन द्या’’ असंही विनोद कापरीनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. विनोद कापरी यांनी आपलं हे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केलं आहे. विनोद कापरी यांनी ’गुजरात फाईल्स’ संदर्भात माहिती देताना पुढे सांगितलंय की, ’’काही निर्मात्यांनी या सिनेमाची निर्मिती करण्यास तयारी दर्शवली आहे. माझं बोलणं काही निर्मात्यांशी सुरू आहे. फक्त त्यांना आश्वासन हवं आहे की ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल नरेंद्र मोदी आता बोलत आहेत तेच स्वातंत्र्य गुजरात फाईल्स सिनेमाला दिलं जाईल’’. आता यावर मोदी गटातून काय सूर उमटतोय याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.