Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeक्राईमसैन्य भरतीसाठी बनावट दाखला; उमेदवार कोठडीत

सैन्य भरतीसाठी बनावट दाखला; उमेदवार कोठडीत

औरंगाबाद : बनावट जन्म दाखला सादर करून सैनिक भरतीत सहभाग घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कर्नल तरुणसिंग भगवानसिंग जमवाल यांनी छावणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात केज तालुक्यातील मस्साजोग येथील शेख अनिस शेख अल्लाउद्दीन (२६) याला पोलिसांनी अटक केली. त्याला १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस. मुळे यांनी दिले. कर्नल तरुणसिंग जमवाल हे औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली, जळगाव, बीड आणि लातूर या विभागाचे सैन्य अधिकारी म्हणून काम पाहतात. २०१६ ते २०२० या काळात वरील विभागात सैन्य भरती प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी जालना येथील २०१७ च्या भरती प्रक्रियेत विजय नामदेव मनगटे (रा. वाकड, ता. कन्नड), जळगाव येथील २०१८ च्या भरती प्रक्रियेत  शंकर सुरेश वाघ (रा. पळसखेड चक्का ता. सिंदखेड जि. बुलडाणा), २०१७ मध्ये जालना येथील  महाबळेश्वर पुंडलिकराव केंद्रे (मूळ रा. दैठणा, ता. कंधार), २०१६ मध्ये नांदेड येथील प्रशांत रामचंद्र महाले (मूळ रा. दुसाने, ता. साक्री, जि. धुळे), किरण कौतिक भाडगे (रा. वाकड, ता. कन्नड) आणि अनिस अलाऊद्दीन शेख (रा. माळी गल्ली, परभणी) यांनी ऑनलाइन अर्ज भरले होते, मात्र त्यावेळी ते उमेदवार अपात्र ठरले. त्यानंतर वरील सर्व उमेदवारांनी २०२० मध्ये सैन्य भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरले. मात्र वरील उमेदवारांनी यावेळी आपल्या जन्म तारखेचे बनावट प्रमाणपत्र सादर केले. विशेष म्हणजे यावेळी सर्व उमेदवार मैदानी व लेखी परीक्षेत उत्तीर्ण होऊन भरतीसाठी पात्र ठरले. कागदपत्रांच्या छाननी दरम्यान हा बनावट दाखल्याचा प्रकार उघकीस आला. प्रकरणात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात सुधीर सोनवणे (रा. मस्साजोग ता. केज) याचा शोध घेऊन चौकशी करण्यासाठी शेख अनिस याला पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील जनार्दन जाधव यांनी न्यायालयाकडे केली. अनिस याने अंबाजोगाईतील योगेश्वरी विद्यालयात बनावट दाखल्याच्या आधारे प्रवेश घेतला होता. त्याची कागदपत्रे जप्त करायची असल्याचेही न्यायालयाला सांगितले.

Most Popular

error: Content is protected !!