आ.मेटेंच्या लक्षवेधीनंतर नगरविकास मंत्र्यांनी केली कारवाई
सीओ गुट्टे यांची चौकशी होवून कारवाई होणार
बीड (रिपोर्टर) विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बीड नगरपालिकेतील अनियमित कारभार चांगलाच गाजला असून नगरपालिकेतील पाणीपुरवठा अभियंता, शहर अभियंता, आस्थापना विभागाचे जाधव आणि कनिष्ठ आरेखक सय्यद सलीम यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात येईल, अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली. दरम्यान सीओ गुट्टे यांची चौकशी करून त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात अनेक शासकीय विभागासोबत बीड नगरपालिकेतील अनियमित कारभाराचा प्रश्न एका लक्षवेधीद्वारे आ. विनायक मेटे यांनी मांडला. त्यांच्या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना नगरविडकास राज्यमंत्री यांनी बीड नगरपालिकेचे सीओ हे आपल्याला त्यांच्या वैयक्तिक कामासाठी विचारून गेलेले आहेत मात्र जे इतर चार अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना दुसर्या दिवशी सकाळी याबाबत माहिती देण्यासाठी बोलवले होते मात्र ते आलेले नाहीत. त्यांचे फोनही लागत नाहीत. ते विधान मंडळाला गांभीर्याने घेत नसल्यामुळे न.प.पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राहुल टेकाळे, शहर अभियंता खाडे, आस्थापना विभागाचे जाधव आणि कनिष्ठ आरेखक सय्यद सलीम यांना तडकाफडकी निलंबीत केले जाईल. निलंबनानंतर त्यांची चौकशीही केली जाईल, असे उत्तर या अधिवेशनात आ. विनायक मेटे यांनी विचारलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री तनपुरे यांनी म्हटले. यावर प्रतिप्रश्न विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित करत कर्मचार्यांवरच निलंबनाची कारवाई केली, अधिकार्यांना कसेकाय सोडता? यावर रामराजे निंबाळकर यांनी सीओ गुट्टे यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबन करण्याचे निर्देश दिले आहेत.