बीड (रिपोर्टर): जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक बडे आल्यापासून कामकाज पुर्णपणे ढेपाळले. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. डॉक्टरासह अनेक कर्मचारी गैरहजर असतात. सोनोग्राफीसाठी टोकन पद्धत सुरू करण्यात आली मात्र टोकन देऊनही दोन ते तीन दिवस नंबरच येत नाही. गर्भवती महिलांना सोनोग्राफीसाठी कित्येक तास थांबावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयातील अनागोंदी कारभार सुधारण्याची मागणी केली जात आहे.
जिल्हा रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचार घेतात. उपचार मोफत असल्यामुळे रुग्णांची संख्या वाढली. रुग्णालयात मोठा स्टाफ असतानाही कर्मचारी आणि डॉक्टर हजर नसतात. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बडे हे आल्यापासून कामकाज सुधारण्याऐवजी ढेपाळले आहे. सोनोग्राफीसाठी लवकर नंबर येत नाही. टोकन देऊन सोनोग्राफी केली जाते. टोकन दिल्यानंतरही दोन ते तीन दिवस वेटिंग करावी लागते. गर्भवती महिलांना कित्येक तास सोनोग्राफीच्या कक्षेसमोर थांबावे लागते. सोनोग्राफीबाबत रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी अधिकचा स्टाफ आणि जास्तीच्या मशीन असणे गरजेचे आहे.