बीड पोलिसांनी मुलास ताब्यात घेतले; मुलास शांतीवन येथे केले दाखल
अज्ञात मातेविरोधात गुन्हा
बीड (रिपोर्टर) बीड बसस्थानकामध्ये अडीच वर्षाचा बेवारस मुलगा ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचार्याला निदर्शनास आला. सदरील कर्मचार्यांनी विविध ठिकाणी विचारपुस केली. मात्र कोणीच मुलाबाबत काही सांगितले नाही. या मुलास जिल्हा रूग्णालयात दाखल करून त्यानंतर त्यास शांतीवन येथे सोडण्यात आले आहे. मुलाला सोडणार्या अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाभिषण भागवतराव सोळंके हे बीड बसस्थानकामध्ये रात्री ड्युटीला होता. त्यांना एका बेंचवर अनोळखी मुलगा दिसून आला. त्या मुलाकडे त्यांनी विचारपूस केली असता सदरील मुलगा बोलत नव्हता. इतर ठिकाणी त्यांनी मुलाबाबत माहिती दिली. मात्र कोणीच हा मुलगा आपला आहे असे सांगितले नाही. सदरील या मुलास जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचार करून त्यास शांतीवन येथे पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात कलम 317 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाला सोडून देणार्या माता-पित्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.








