बीड (रिपोर्टर) गल्ली ते दिल्ली अधिराज्य गाजवू पाहणार्या भारतीय जनता पार्टीला बीडमध्ये मात्र वरचस्व स्थापन करण्यात यश आले नाही. 26 वार्डात 52 नगरसेवकांसाठी निवडणूक होत असताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी न.प. निवडणुकीबाबत पदाधिकार्यांसह बोलवलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला मात्र केवळ पाच-पन्नास पदाधिकारी उपस्थित असल्याचे दिसून आले. बैठकीमध्ये अनेक पदाधिकार्यांनी निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे भाजपाला स्वतंत्र 52 इच्छुक नगरसेवक मिळतात की नाहीत यावरच उलटसुलट चर्चा होत असून मस्केंचं नेतृत्व हे जिल्हा भाजपासाठी मारक आहे की संजीवनी देणारा हे मात्र आगामी काळच ठरवेल.
जिथं ‘बीड का आमदार कैसा हो, राजेंद्र मस्के जैसा हो’ अशा घोषणा दिल्या जातात तिथं त्या जिल्हाप्रमुखाच्या बैठकीला तेही निवडणुकीच्या किती कार्यकर्ते आणि पदाधिकारी असायला हवेत. जो पक्ष राज्यात आणि देशात एकनंबरला म्हणून गणला जातो त्या पक्षात निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची किती गर्दी असायला हवी, परंतु बीड नगरपालिकेबाबत मात्र इच्छुकांची बहुगर्दी तर सोडा 26 वार्डांसाठी जे 52 नगरसेवक असतात तेवढे लोक बैठकीलाही उपस्थित नसल्याचे उघड झाले. भाजपाच्याच पदाधिकार्यांनी सोशल मिडियावर टाकलेल्या फोटोमधून काल राजेंद्र मस्के यांनी बोलवलेल्या बैठकीला केवळ 50 ते 52 लोक उपस्थित असल्याचे दिसून आले. त्या 52 लोकांमध्ये मस्केंसोबत शहराबाहेरील असलेले पाच-दहा कार्यकर्ते होते. म्हणजे 35 ते 40 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बीडसारखी संवेदनशील नगरपालिका निवडणूक लढवण्याची बैठक भाजपाच्या अध्यक्षांनी घेतली. सुत्रांच्या माहितीनुसार बैठकीला उपस्थित असणार्या अनेक पदाधिकार्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणे तर सोडा निवडणूक लढवायची नाही, असे स्पष्टपणे सांगितले. एखाद दुसर्या पदाधिकार्याने आपण निवडणूक लढवणार नसल्याचे असे स्पष्ट सांगितले. दोन-चार महत्वपुर्ण कार्यकर्ते आणि भाजपाशी इमान राखणार्या पदाधिकार्यांनी आपण निवडणूक लढवणार ही भूमिका स्पष्ट केली. एकूणच बीडमध्ये राजेंद्र मस्केंच्या नेतृत्वात भाजपाची प्रगती होतेय की अधोगती हे यातूनच स्पष्ट होते, असेही भाजपाच्याच काहींनी प्रतिक्रिया दिल्या.