मुख्यमंत्री फडणवीसांना या बाबत बोलणार-निलम गोरे
बीड, (रिपोर्टर)ः- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्महत्या केलेल्या साक्षी कांबळेच्या आईने थेट संवाद साधल्यानंतर तातडीने आज विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोरे यांनी कोयना कांबळे यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. या प्रकरणात धाराशिव पोलिसांची दिरंगाई केल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे सांगून धाराशिवचे पोलीस उपअधिक्षक स्वप्नील राठोड यांचे सक्षम्य दुर्लक्ष पहायला मिळाले. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बोलणार असल्याचे निलम गोरे यांनी म्हंटले.पुढे निलम गोरे यांनी सायबर क्राईमकरून कोणी मुलींना त्रास दिला तर याद राखा तुमची गाठ महाराष्ट्र पोलिसांसोबत आहे असेही त्यांनी सांगितले.

बीड येथील साक्षी कांबळे या मुलीने छेडछाडीला कंटाळून धाराशिव येथे आत्महत्या केली. या घटनेने उभ्या महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. मुलीची आई कोयना कांबळे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन करून त्यांच्या कुटूंबियावरची आपबिती सांगितली. आज सकाळी विधान परिषदेच्या उपसभाती निलम गोरे या बीडमध्ये डेरेदाखल झाल्या त्यांनी साक्षी कांबळे यांच्या आईची भेट घेतली. यावेळी कांबळे कुटूंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ज्या मागण्या केल्या त्या गोरे यांना सांगितल्या ते सांगतांना साक्षीची आई म्हणाली माझ्या मुलीसोबत जे झाले ते दुसर्याच्या मुलीसोबत होवू नये.तो जो आरोपी जामीनवर सुटला आहे त्याची जामीन रद्द करण्यात यावी, त्याची जामीन रद्द न झाल्यास मी काही तरी करून घेईल असा टोकाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावर उपसभापती निलम गोरे म्हणाल्या, साक्षीच्या आईने आमच्याकडे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यथा मांडल्या आहेत. धाराशिव येथील पोलीस उपअधिक्षक स्वप्नील राठोड यांचे सक्षम दुर्लक्ष पहायला मिळाले आहे. पोलीसांनी या प्रकरणात दिरंगाई केल्याचे दिसत आहे. या बाबत आपण मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेवून त्यांना बोलणार आहे. ज्या मुलींना त्रास झाला असेल त्यांनी पोलिसात तात्काळ तक्रार करावी, सायबर क्राईमकरून कोणी मुलींना त्रास दिला तर याद राखा तुमची गाठ महाराष्ट्र पोलिसांसोबत आहे.या प्रकरणातील तपासी अधिकारी बदलला पाहिजे अशी आमची मागणी आहे असे गोरे यांनी सांगितले.







