
मुख्य माफिया अन् ‘डायरेक्टर’ गुटख्याचा डिलर मोकाट
एसपींचे नेक इरादे यंत्रणेकडून नाकाम
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची घडी व्यवस्थीत बसविण्यासाठी माफियांविरोधात जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी मोहीम उघडली असली तरी मोहिमेवर गेलेली यंत्रणा कारवाई तर करते मात्र प्रमुख माफियांना अभय देत असल्याचे अनेक घटनाक्रमावरून उघड होत असून काल गेवराई तालुक्यातील पांढरवाडीत मोठ्या प्रमाणावर गुटखा पकडला गेला मात्र इथे प्रमुख आरोपीला गुन्ह्यामधून वगळण्यात आले, त्याचबरोबर या छाप्यात डायरेक्टर नावाचा पाच ते सात लाख रुपयांचा गुटखा पकडण्यात आला आहे. त्याचा मराठवाड्याचा डिलर हा परळीचा आहे, त्याचे सुद्धा नाव गुन्ह्यामध्ये नसल्याचे दिसून येते. एकीकडे कारवाई होते, माल जप्त होतो, मात्र माफियांना खालची यंत्रणा सोडून देते. म्हणूनच जिल्ह्यात गुटखा बंदी होत नसल्याचे दिसून येत आहे. गेवराईच्या प्रकरणात जिल्हा पोलीस अधिक्षकांनी लक्ष घातले तर मोठे माफिये यंत्रणेने मोकाट सोडून दिल्याचे चौकशीतच समोर येईल.
गेवराई तालुक्यातील पांढरवाडीत गुटखा असल्याची गोपनीय माहिती स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला झाली. त्यानुसार काल या पथकाने पांढरवाडीत दोन ठिकाणावरून गुटखा जप्त केला. याठिकाणी दादासाहेब जाधव याच्यावर गुन्हाही दाखल केला आणि त्याला ताब्यातही घेतले. मात्र दुसरा मुख्य गुटखा माफिया आणि तोही जाधव नावाचा त्याला मात्र या गुन्ह्यामधून वगळण्यात आले. त्याचे नाव नेमके कुणाच्या सांगण्यावरून वगळले गेले हे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी संबंधित टिमला विचारले आणि हे विचारताना प्रत्यक्ष कारवाई नेमकी कशी झाली? आणि रेकॉर्डवर ती अर्धवट का आली? याची माहिती घेतली तर दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होईल. विशेष म्हणजे या कारवाईत 40 लाख रुपयांच्या गुटख्यासह अन्य साहित्य जप्त केल्याबाबत नक्कीच संबंधित टिमचे कौतुक आणि अभिनंदन परंतु जप्त केलेल्या गुटख्यामध्ये जो डायरेक्टर नावाचा पाच ते सात लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे त्याचा जो मराठवाड्याचा डिलर परळीमध्ये बसला आहे त्यावर मात्र काहीही कारवाई नाही.
विशेष म्हणजे संबंधित पथकातील आणि परळी पोलीसमधील एक-दोन अधिकार्यांनी संबंधित डिलर यांच्याशी संवाद साधल्याचे बोलले जाते. डायरेक्टर नावाचा गुटखा हा बीड जिल्ह्यात नवा असला तरी त्याचा मराठवाड्याचा डिलर कोण? हे यंत्रणेला माहित आहे. परंतु कारवाई करायची, मालही जप्त करायचा पण माफियांना मोकाट सोडायचे हा धंदा या यंत्रणेने सुरू केला. त्यामुळे एसपींचे नेक इरादे इथे तडजोडीत नाकाम होताना दिसून येतात. या कारवाईत जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी बारकाईने माहिती घेतली पुढच्या कारवाया थेट आणि सरळ होतील, परिणामी बीड जिल्ह्यातला गुटखा काही प्रमाणात का होईना बंद होईल.






