
मराठवाड्यात 204 ठार, तर 3246 पशूधन दगावले
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात गेल्या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये वीज पडून 29 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेतकर्यांचे 393 पशुधन वीज पडून दगावल्याची माहिती समोर येत आहे. मराठवाड्यामध्ये वीज पडून मृत्युमुखी पडणार्यांची संख्या तब्बल 204 असून सर्वाधिक मृत्यू हे नांदेड जिल्ह्यात 43 व्यक्तींचे झाल्याचे सांगण्यात येते. त्यापाठोपाठ लातूर, परभणी जिल्ह्याचा आकडा मोठा आहे. मराठवाड्यामध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये तब्बल 3246 पशूधन वीज पडून मृत्युमुखी पडल्याचेही संभाजीनगर आयुक्तालयाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मराठवाड्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून वादळी वार्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी नद्या-नाल्या वाहून गेल्या आहेत. विजांचा कडकडाट आणि वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये बीड जिल्ह्यात तब्बल 29 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे तर 393 पशूधन वीज पडून दगावले गेले आहेत. मराठवाड्यामध्ये तब्बल 204 जणांचा मृत्यू तर 3246 पशूधन दगावल्याचे सांगण्यात येते. नांदेडमध्ये 2022 मध्ये 25, 2023 मध्ये 8, 2024 मध्ये 10 जणांचा वीज पडून मृत्यू झाला. लातूर आणि परभणी जिचल्ह्यात तीन वर्षात प्रत्येकी 30 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर बीड पाठोपाठ जालना, संभाजीनगरमध्ये प्रत्येकी 23 व हिंगोली आणि धाराशीव जिल्ह्यात प्रत्येकी 12 जणांनी जीव गमावला असल्याची माहिती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. मराठवाड्यामध्ये तब्बल 3246 जनावरे दगावली आहेत. जालना जिल्ह्यात सर्वाधिक 703, परभणी जिल्ह्यात 637, बीड जिल्ह्यात 393, लातूर जिल्ह्यात 343, धाराशीव 346, हिंगोली 265 आणि संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात वीज पडून 179 पशूधन दगावले आहेत.
शासनाकडून अशी मिळते मदत…
मृत व्यक्तीच्या वारसाला 4 लाख
म्हैस, गाय, दूभती जनावरे 37500
शेळी, मेंढी, वगार लहान दुभती जनावरे 4000
बैल, उंट, घोडा 32000
गाढव, खेतर, शिंगरू, वासरे 20000






