
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर): परळीकडून त्र्यंबकेश्वरकडे निघालेल्या बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्या बसमधील प्रवासी दुसर्या बसमध्ये बसवत असताना बसच्या वाहकास बळवंत डावकरसह सोनु शिंदे व अन्य तीन ते चार जणांनी ‘बस इथे का थांबवली?’ असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून वाहक संतोष शेरे यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, 24 मे रोजी बस क्र. एम.एच. 20 बी.आय. 3647 ही बस परळीहून त्र्यंबकेश्वरसाठी निघाली होती. सदरची बस ही ढेकणमोहा येथील एच.पी. पेट्रोल पंपासमोर आली असता तिच्यात तांत्रिक बिघाड झाला. म्हणून बस वाहक संतोष सुखलाल शेरे (वय 41 वर्षे) यांनी सदरची बस ही पेट्रोल पंपाजवळ लावून त्या बसमधील प्रवासी अन्य बसमध्ये बसवून देण्यासाठी थांबले असता त्याठिकाणी बळवंत डावकर, सोनू शिंदे व इतर अनोळखी तीन हे घटनास्थळी आले व ‘बस इथे का थांबवली?’ असे म्हणत वरील आरोपींनी वाहकास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या दरम्यान बस (क्र. एम.एच. 23 ए.यू. 6221) या क्रमांकाची माजलगाव-बीड ही बस त्याठिकाणी आली. त्या बसच्या चालकाने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्याला मारहाण करण्यात आली. म्हणून या प्रकरणी बसवाहक संतोष शेरे यांनी पिंपळनेर पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी बळवंत डावकर यांच्यासह पाच जणांविरोधात पिंपळनेर पोलिसात गु.र.नं. 130/2025 कलम 132, 121 (1), 3 (5) भा.न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






