
कपीलधारसह राज्यातले प्रमुख धबधबे धो-धो…
बीड (रिपोर्टर): गेल्या तीस वर्षांच्या कालखंडात कधी दुष्काळ, कधी सुकाळ, कधी पश्चिम महाराष्ट्रात पाऊस, मराठवाड्यात दुष्काळ, खानदेश, कोकण आदी भागात पावसाचा लपंडाव त्यामुळे उभा महाराष्ट्र 2012-13 साली प्रचंड दुष्काळाच्या छायेत राहिला. त्यानंतरही वेगवेगळ्या विभागात पाऊस कमी-जास्त दशकभरात पडत गेला. मात्र तब्बल 32 वर्षानंतर यावर्षी कडाक्याच्या मे महिन्यात पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत आहे. परिणामी 32 वर्षानंतर प्रथमच मे महिन्यात राज्यातील प्रमुख धरणे धो-धो वाहताना दिसून येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने बीड येथील कपीलधारसह महाबळेश्वर, सातारा, सांगली, बारामती, रायगडसह आदी भागांचा समावेश आहे तर आज मुंबई महानगरीला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.

अवकाळी पावसाने धरणातील पाणी पातळीत वाढ
जिल्ह्यात आतापर्यंत 85.1 मिमि पाऊस
गेल्या वीस दिवसापासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा काही प्रमाणात फायदाही झाला. धरणामध्ये पाण्याच्या साठ्यात वाढ झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 85.1 मिमि एवढा पाऊस पडला आहे.
मराठवाड्यात 6 मे पासून अवकाळी पावसाला सुरूवात झाली. आता पर्यंत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात 115 मिमि. जालना 116 मिमि. बीड 85.1 मिमि, लातुर 118.2 मिमि, धाराशिव 109.5 मिमि, नांदेड 54.7 मिमि, परभणी 67.1 मिमि, हिंगोली जिल्ह्यात 70.4 मिमि एवढा पाऊस झाला आहे. मराठवाड्यात आतापर्यंत सरासरी 91.4 मिमि पावसाची नोंद झाली आहे. सलग आणि मोठ्या पावसाच्या दहा दिवसांची नोंद झाली. या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली. अनेेक नद्या नाल्यांना पाणी आले हेाते. काही नद्यातर दुथडी भरून वाहिल्या आहेत. अजुनही पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 30 मे पर्यंत अवकाळी पाऊस पडेल असे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पात 32.64 टक्के पाणी साठा आहे.






