
एका दरोडेखोराच्या मुसक्या बांधल्या दुसरा अंधाराचा फायदा घेवून पळाला
गेवराई, (रिपोर्टर)ः- पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी गेल्या काही दिवसापासून गून्हेगारी आणि गुन्हेगाराविरोधात आक्रमक भुमिका घेत त्यांच्या मुसक्या बांधण्याचे सक्त आदेश जिल्हाभरातील पोलिसांना दिल्यानंतर दोन कुख्यात दरोडेखोर गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नागझरी येथील पारधी वस्तीवर दडून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी नागझरीच्या त्या वस्तीवर छापा मारला. त्यात एक कुख्यात दरोडेखोर मिळून आला तर त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. पोलिसांनी त्याचा काही काळ पाठलागही केला. मात्र तो मिळून आला नाही. मिळालेला दरोडेखोर यांने बीड, अहिल्यानगर, सोलापुर हद्दीत दरोडे टाकले आहेत. बीड पोलिसांनी तात्काळ त्याला सोलापुर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
गेवराई तालुक्यातील नागझरी परिसरात असलेल्या पारधी वस्तीवर दोन कुख्यात दरोडेखोर वावरत असल्याची महत्वपूर्ण माहिती गेवराई पोलिसांना झाल्यानंतर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास गेवराई पोलिसांनी त्या वस्तीवर छापा मारला. त्यावेळी भगवान ईश्वर भोसले (वय 21, रा.बेलगाव ता.कर्झत जि.अहिल्यानगर) हा दरोडेखोर मिळून आला. मात्र त्याच्या सोबत असलेला अन्य एक दरोडेखोर छाप्या दरम्यान घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. पोलिसांनी काही काळ त्याचा पाठलागही केला. तब्बल एक तास चोर पोलिसांचा खेळ वस्ती परिसरात रंगला. मात्र अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला.
पकडलेला भगवान भोसले या दरोडेखोराने बीड, अहिल्यानगर, सोलापुर जिल्ह्यात दरोडे टाकले आहेत. त्याचबरोबर दरोडा टाकण्याच्या प्रयत्ना बाबत त्याच्यावर गुन्हे दाखलआहेत. मध्यंतरी त्याने करमाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाची घरफोडी केली त्याबाबत त्याने कबुलीही दिली. म्हणुन त्याला तात्काळ तपासकामी करमाळा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कमलेश मिना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक प्रविण बांगर, म.पो.उप.निरिक्षक निशिगंधा खुळे, पोलीस उपनिरिक्षक राम खोत, श्रीमंत उबाळे, सुरेश पारधी, अशोक हंबर्डे, चंद्रसेन माळी, मुकूंद रोकडे, जयराम उबे व होमगार्ड यांनी केली.








