जेजुरी : जेजुरी-मोरगाव रस्त्यावर किर्लोस्कर कंपनीसमोर बुधवारी (दि. १८) रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास कारने पीकअपला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका महिलेसह 8 जणांचा मृत्यू झाला तर 2 मुलांसह 5 जण जखमी झाली.
जेजुरी-मोरगाव रस्त्यावरील किर्लोस्कर कंपनी समोरील श्रीराम हॉटेलबाहेर पीकअप टेम्पोमधील साहित्य उतरविण्याचे काम सुरू होते. यावेळी जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या कारने पीकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पोतून साहित्य खाली उतरविणारे, हॉटेलमधील मालक व कारमधील व्यक्ती तसेच एका महिलेसह 8 जण जागीच ठार झाले. यासह 2 मुले, 1 महिला व 2 पुरुष गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांची नावे
सोमनाथ रामचंद्र वायसे, रामु संजीवन यादव (रा. नाझरे कप ता. पुरंदर), अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर), अक्षय शंकर राऊत (रा. झारगडवाडी, ता. इंदापूर), अजय कुमार चव्हाण (रा. उत्तरप्रदेश), किरण भारत राऊत (रा. पवारवाडी, ता. इंदापूर), अश्विनी शंकर ऐसार (रा. नागनसूर हेद्रे, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. आणखी एका मृतदेहाची ओळख पटलेली नाही.








