
11 तोळे सोने, 30 तोळ्यांपेक्षा जास्त चांदी, नगदी दीड लाखांची रोकड पळविली
घटनास्थळी श्वानपथकासह फिंगर पथकाला पाचारण
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल, चोरट्यांचा शोध सुरू
अंबाजोगाई (रिपोर्टर): बंद घराच्या दाराचा कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करत घरामधील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यात घडली. घरमालक सदरचं घर बंद करून आपल्या अन्य दुसर्या घरामध्ये गेले होते. चोरट्यांनी या घरातून तब्बल दहा तोळे सोन्याचे दागिने तर 30 ते 35 तोळे चांदीचे दागिने चोरून नेले. या घटनेने खळबळ उडाली असून घटनेची माहिती कळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. श्वानपथकासह फिंगर प्रिंट पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सदरची घटना ही काल रात्री अकराच्या सुमारास अंबाजोगाईच्या निवृत्तीनगर चतूरवाडी भागात घडली.
याबाबत अधिक असे की, अंबाजोगाई तालुक्यातील निवृत्तीनगर चतुरवाडी येथील किरण बंडु चव्हाण यांचे टायर व मोटारचे दुकान आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून निवृत्तीनगर चतुरवाडी या ठिकाणी राहतात. 17 जून रोजी साडेदहाच्या सुमारास चव्हाण हे आपल्या घराला कुलूप लावून अन्य दुसर्या घरामध्ये गेले होते. काल जेव्हा ते या घरी आले तेव्हा घराच्या दाराचा कोंडा तुटलेला दिसला. आतमध्ये गेले असता सामान अस्तव्यस्त पहायला मिळाले. घरामध्ये चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा अज्ञात चोरट्यांनी किरण चव्हाण यांच्या बंद घराच्या दाराचा कोंडा तोडून घरामध्ये प्रवेश केल्याचे निदर्शनास आले.
चोरट्यांनी कपाटामधील सोन्या-चांदीचे दागिने त्यामध्ये एक तोळ्याची बोरमाळ, एक तोळ्याचे गंठण, एक तोळ्याचे झुंबर, एक तोळ्याचे सोन्याचे सेवन पीस, पाच सोन्याच्या अंगठ्या (प्रत्येकी एक तोळा) सोन्याची काडी, बाळी (एक तोळा) असे अकरा तोळे सोने त्याचबरोबर दोन चांदीचे गणपती, दहा तोळे, पायातील चैन (पाच तोळे), जोडवे, कडे, पंचपाळं, घरातील संसारोपयोगी वस्तू, एक सौर ऊर्जा पॅनल, लाल रंगाची सतरंजी, साडी व रोख दीड लाख रुपये चोरून नेले. सदरची चोरी ही आजच्या बाजार भावात 20 लाखांपेक्षा अधिकची असून पोलीस दफ्तरी 8 लाख 5 हजार 750 रुपयांचा ऐवज गेल्याचे नोंदवण्यात आले आहे. जबरी चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर अंबाजोगाई पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत घटनास्थळावर तात्काळ श्वानपथकाला पाचारण केले. फिंगर प्रिंटस् पथकही घटनास्थळी डेरेदाखल झाले आहेत. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात किरण चव्हाण यांच्या फिर्यादीवरूएन गु.र.नं. 197/2025 कलम 331 (4), 305 अ.भा.न्या.सं. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप हे करीत आहेत. या प्रकरणी सायं. दैनिक बीड रिपोर्टरने जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सदरची घटना ही रात्री घडली असून पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली आहे.






