
अध्यक्ष, सचिवासह इतरांवर गुन्हा दाखल
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातील अनेक मल्टीस्टेटने खातेदारांची वाट लावून ठेवली. खातेदारांचे लाखो नव्हे करोडो रूपये मल्टीस्टेटमध्ये अडकून पडलेले आहेत. माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील धनुकेश्वर मल्टीस्टेटमध्येही फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका खातेदाराचे 12 लाख रूपये या मल्टीस्टेटमध्ये अडकून पडले. मल्टीस्टेट पैसे देत नसल्याने खातेदाराने थेट अध्यक्षासह इतरांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पंढरी किसन केकान (रा.चाटगाव ता.धारूर) यांनी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील धनुकेश्वर मल्टीस्टेटमध्ये 12 लाख रूपये ठेवले होते. त्यांना 12.05 टक्के व्याजदराचे आमिष दाखविण्यात आले होते. विशिष्ट कालावधीसाठी केकान यांनी या मल्टीस्टेटमध्ये पैसे ठेवले होते. कालावधी संपल्यानंतर ते पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना मल्टीस्टेटकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जावू लागली. आपली यामध्ये फसवणूक झाल्याचे केकान यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत दिंद्रुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार मल्टीस्टचे अध्यक्ष शिवहरी अशोक यादव, उपाध्यक्ष सचिन पांडूरंग रोडगे, सचिव रामेश्वर धर्मराज तांदळे, मुख्या शाखा प्रमुख पांडुरंग सुदाम तांदळे, दिंद्रुड शाखा अधिकारी ज्ञानेश्वर सुदाम यादव या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





