
चुकलेल्या अधिकारी कर्मचार्याला एकदा समज दिली,दुसर्यांदा कारवाई करण्यात येईल-सीईओ रहेमान
बीड, (रिपोर्टर)ः-येत्या मार्च महिन्यापर्यंत बीड जिल्ह्यात 150 वर्ग खोल्याचे बांधकाम करण्याचे नियोजन करण्यात येत असून ज्या शाळा मोडकळीस आल्या आहेत त्याची प्राथमिकता ठरवून त्याही दुरूस्त केल्या जातील. येत्या दिवाळीपर्यंत 75 हजार घरकुल बांधकाम करण्यात येणार असून नरेगा आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गतची कामे वेळेत आणि दर्जेदार करण्याकडे माझा कल असून कामात अनियमितता करणार्या अधिकारी कर्मचार्यांना एकदा नोटीस देवून समजावून सांगितले जाईल दुसर्यांदाही अधिकारी कर्मचार्यांनी चुक केली तर त्यांच्यावर मात्र कडक कारवाई करण्यात येईल असे नुतन सीईओ जितीन रहेमान यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये सीईओ रहेमान यांनी आज सवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक गावातील सांड पाण्याची कामे, बंदीस्त नाली बांधकाम ही कामे दर्जेदार झाली पाहिजेत. प्रत्येक तालुक्यातून चांगले काम करणार्या सरपंचाची टिम तयार करून त्यांच्या चांगल्या सूचना असतील त्याही स्विकारल्या जातील. एकूण 55 सरपंचाची टिम उभा करून जिल्ह्यात ग्रामपंचायत अंतर्गत होणारी कामे दर्जेदार करण्यावर भर दिला जाईल. बीड जिल्ह्याला जवळपास 2 लाख घरकुलांचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. गेल्या पाच दिवसात मी 20 हजार घरकुलांना मान्यता दिलेली आहे. येत्या दिवाळीपर्यंत यातील 75 हजार घरकुलाचे बांधकाम करून घेण्याकडे प्रशासनाचा कल असणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांना अचानकपणे भेटी देण्यात येतील. नरेगा अंतर्गतची गायगोठा, रस्त्याची कामे वेळेत पूर्ण करण्याकडे प्रशासनाचा कल असेल. सोबत जिल्हा परिषदेचे सर्व कामकाज हे ई ऑफीसद्वारे करण्यात येणार आहेत. प्रत्येक पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे इतर नऊ विभाग हे प्रत्येक संचिका ई ऑफीसद्वारे काम करतील. जिल्ह्यात येत्या मार्च महिन्यापर्यंत 150 वर्ग खोल्याचे बांधकाम करण्यात येणार असून ज्या अत्यावश्यक दुरूस्त शाळा आहेत त्याही दुरूस्त करण्यात येणार आहेत. चुकलेल्या कर्मचार्याला एकदा संधी दिल्यानंतर दुसर्यांदा चुकला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असेही सीईओ रहेमान यांनी सांगितले.






